तिरुवनंतरपुरम : पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ६७ अशी समाधानकारक मजल मारली. तीन टी२० सामन्यांच्या मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने हा सामना भारताला जिंकणे अनिवार्य आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे पडत असलेला मुसळधार पाऊस मंगळवारीही कायम होता. त्यामुळे नाणेफेकीलाही उशीर झाला. त्याचप्रमाणे मैदान खूप ओले राहिल्याने सामना सुरु होण्यास अडचण येत होती. यामुळे थोड्यावेळाने पंचांनी मैदानाचे परिक्षण केल्यानंतर सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने यजमान संघाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. पहिले षटक सावधपणे खेळल्यानंतर दुसºया षटकात दोन जबर धक्के देत किवी संघाने मजबूत पकड मिळवली. हीच पकड त्यांनी अखेरपर्यंत कायम राखताना भारतीय संघाला फटकेबाजीपासून दूर ठेवले. साऊदीने शिखर धवन (६) आणि रोहित शर्मा (८) यांना दुसºयाच षटकात माघारी परतावले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने एक चौकार व एक षटकार ठोकत भारताच्या आशा उंचावल्या. परंतु आक्रमणाच्या नादात तो ईश सोढीचा बळी ठरला. कोहलीने ६ चेंडूत १३ धावा काढल्या. श्रेयश अय्यर (६) अपयशी ठरल्यानंतर मनिष पांड्ये (१७) आणि हार्दिक पांड्या (१५*) यांच्यामुळे भारताला समाधानकारक मजल मारता आली. साऊदी आणि सोढी यांनी प्रत्येकी २ बळी घेत भारताला दडपणाखाली आणले. बोल्टने एक बळी घेतला. त्याचवेळी, पहिल्या दोन सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षण केलेल्या मिशेल सँटनर याने रोहित, धवन आणि मनिष यांचे अप्रतिम झेल घेत भारताला दबावाखाली आणण्याचे मोलाचे योगदान दिले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- निर्णायक टी-20 सामन्यात भारताचे न्यूझीलंडसमोर 68 धावांचे आव्हान
निर्णायक टी-20 सामन्यात भारताचे न्यूझीलंडसमोर 68 धावांचे आव्हान
तिस-या आणि निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मालिका विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारताने न्यूझीलंडला आठ षटकात 68 धावांचे आव्हान दिले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 10:16 PM