नॅशनल क्रश, भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर आणि महिला प्रीमिअर लीगमधील ( WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) आणखी एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन, भारताची स्मृती मानधना, ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग व डेव्हिड वॉर्नर आणि वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड यांनी आगामी दी हंड्रेड ( The Hundred draft ) लीगसाठी नोंदणी केली आहे. २२ देशांतील ८९० खेळाडूंनी द हंड्रेड ड्राफ्टसाठी नोंदणी केली असून पुरुष आणि महिला स्पर्धेला २० मार्चपासून सुरूवात होण्याचा अंदाज आहे.
आठ पुरुष संघांना प्रत्येकी १० खेळाडूंना कायम ठेवण्याचा पर्याय होता आणि महिला संघ ८ खेळाडूंना कायम ठेवू शकतो. त्यानुसार एकूण १३७ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते आणि ड्राफ्टच्या दिवशी आणखी ७५ स्पॉट्स भरायचे आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वाइल्डकार्ड ड्राफ्टद्वारे पुरुष आणि महिला दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी २ असे आणखी १६ खेळाडू जोडले जातील.
महिलांच्या स्पर्धेत बर्मिंगहॅम फिनिक्स संघ खेळाडूची पहिली निवड करतील आणि पुरुषांच्या स्पर्धेत ही संधी नॉर्दर्न सुपरचार्जर्सला असेल. या यादीत इंग्लंडच्या डेविड मलान, एमी जोन्स, ऑली पोप, लॉरेन फाइलर आणि जेसन रॉय यांचा समावेश आहे. भारताच्या जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष; न्यूझीलंडचे डॅरिल मिशेल, सुझी बेट्स, टिम साऊदी व रचिन रवींद्र; ऑस्ट्रेलियाचे ॲशले गार्डनर, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, बेथ मुनी व ॲनाबेल सदरलँड; पाकिस्तानचा शादाब खान व फातिमा सना या इतर काही आघाडीच्या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
वेस्ट इंडिजचे निकोलस पूरन, डिआंड्रा डॉटिन व शमर जोसेफ; आयर्लंडचे ओरला प्रेंडरगास्ट व पॉल स्टर्लिंग; श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज; दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली व लुंगी एनगिडी, अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान; बांगलादेशच्या जहांआरा आलम व शाकिब अल हसन यांनीही ड्राफ्टसाठी आपली नावे नोंदवली आहेत.