ठळक मुद्देन्यूझीलंडकडून 20 शतकं करणारा पहिला फलंदाजसलग सहा सामन्यांत 50हून अधिक धावा करणारा सातवा फलंदाजकोहलीनंतर सर्वाधिक सरासरीने खेळी करण्याचा विक्रम
नेल्सन : रॉस टेलर ( 137) आणि हेन्री निकोल्स ( 124*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेला नमवले. न्यूझीलंडने 115 धावांनी हा सामना जिंकून मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. न्यूझीलंडच्या 364 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 41.4 षटकांत 249 धावांत तंबूत परतला. किवींच्या ल्युक फर्ग्युसन ( 4/40) आणि इश सोधी ( 3/40) यांनी उत्तम गोलंदाजी केली.
टेलरचे हे वन डेतील 20वे शतक ठरले आणि न्यूझीलंडकडून 20 शतकं करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या विक्रमासह टेलर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या पंगतीत स्थान पटकावले आहे. भारताकडून वन डेत सर्वप्रथम 20 शतकं करणारा तेंडुलकर हा पहिलाच फलंदाज होता. सईद अनवर ( पाकिस्तान ), रिकी पाँटिंग ( ऑस्ट्रेलिया) , सनथ जयसूर्या ( श्रीलंका), हर्षेल गिब्स ( दक्षिण आफ्रिका) आणि ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज) यांनी आपापल्या संघांकडून हा मान पटकावला आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम टेलरने नावावर केला आहे. त्यापाठोपाठ नॅथन अॅस्टल ( 16), मार्टिन गुप्तील ( 14), केन विलियम्सन ( 11) आणि स्टीफन फ्लेमिंग ( 8) हे येतात. याशिवाय टेलरने सलग सहा सामन्यांत 50 हून अधिक ( 137, 90, 54, 86*, 80, 181*) धावांची वैयक्तिक खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज ठरला. या क्रमवारीत पाकिस्तानचा जावेद मियाँदाद ( 9) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ गॉर्डन ग्रिनीज, अँड्र्यु जोन्स, मार्क वॉ, मोहम्मद युसूफ, केन विलियम्सन यांचा क्रमांक येतो.
न्यूझीलंडचा हा श्रीलंकेवरील 48 वा वन डे विजय आहे. त्यांनी पाकिस्तानविरुद्धही 48 वन डे सामने जिंकले आहेत. रॉस टेलरने 2018च्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत 13 डावांत 98च्या सरासरीने 920 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली ( 133.55 सरासरी) याच्यानंतर जानेवारी 2018 पासून वन डे सामन्यात सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये टेलरचा क्रमांक येतो.