लॉर्डस् : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स सने आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला जबरदस्त हादरे दिले. एकीकडे पॉट्स भेदक मारा करताना दुसऱ्या टोकाकडून जेम्स अँडरसन याने आग ओकणारा मारा करत न्यूझीलंडची वाताहत केली. या दोघांच्या भेदकतेपुढे इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ ४० षटकांमध्ये अवघ्या १३२ धावांत संपुष्टात आला.
क्रिकेटविश्वाची पंढरी असलेल्या लॉर्डस् येथे पहिले कसोटी विश्वविजेतेपद पटकावलेल्या न्यूझीलंड संघाची दाणादाण उडाली. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय चुकला. कॉलिन डी ग्रँडहोमे हा न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. त्याने ५० चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ४२ धावा करत इंग्लिश माऱ्याचा समर्थपणे सामना केला; परंतु दुर्दैवाने त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही.
पॉट्सने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात भेदक मारा करताना क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. त्याने किवी कर्णधार केन विलियम्सनला अवघ्या २ धावांवर माघारी परतावले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला बळी मिळवला. यानंतर त्याने आणखी ३ बळी घेतले. पॉट्सने केवळ १३ धावांमध्ये ४ बळी घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवला. त्याने ६६ धावांमध्ये ४ बळी घेत इंग्लंडला मजबूत पकड मिळवून दिली. स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : ४० षटकांत सर्वबाद १३२ धावा (कॉलिन डी ग्रँडहोमे नाबाद ४२, टीम साउदी २६; मॅथ्यू पॉट्स ४/१३, जेम्स अँडरसन ४/६६.)
Web Title: newcomer Matthew Pots dream debut; New Zealand scored 132 runs against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.