Join us  

Roger Binny: खेळाडूंना वारंवार दुखापत का होते याच्या तळाशी जाण्याची आमची इच्छा आहे - रॉजर बिन्नी

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 8:03 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात रॉजर बिन्नी यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. सौरव गांगुलीचा तीन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ संपला. जय शाह हे सचिवपदी कायम राहिले, तर राजीव शुक्ला हे उपाध्यक्षपदी कायम राहिले. आशिष शेलार यांची खजिनदार म्हणून  निवड झाली. याशिवाय 2023मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला भारताला न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. बीसीसीआयचा कारभार स्वीकारताच नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी खेळाडूंच्या सततच्या दुखापतीवर मोठे वक्तव्य केले आहे. खेळाडूंना सतत दुखापत का होते याच्या तळाशी जाण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

नवनिर्वाचित बीसीसीआय अध्यक्षांनी म्हटले, "आम्ही भारतीय खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र कसे कमी होईल याकडे प्रथम लक्ष देऊ. जसप्रीत बुमराह विश्वचषकाच्या तोंडावर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला, ज्याचा संपूर्ण योजनेवर परिणाम होतो. खेळाडूंना वारंवार दुखापत होणे ही एक चिंतेची बाब आहे आणि आम्ही या सर्वाच्या तळाशी जाऊन त्यात सुधारणा कशी करता येईल हे पाहण्याची आमची इच्छा आहे. काय चूक होत आहे यावर बसून चर्चा करावी लागेल. आमच्याकडे उत्कृष्ट प्रशिक्षक, फिजिओ आणि इतर तज्ञ आहेत." अशा शब्दांत रॉजर बिन्नी यांनी खेळाडूंच्या दुखापतीवर गंभीर असल्याचे सांगितले. 

सौरव गांगुलींनी दिल्या शुभेच्छा बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नवीन टीमला शुभेच्छा देताना म्हटले, माझ्या रॉजर बिन्नीला शुभेच्छा. नवीन टीम या सगळ्याला पुढे नेईल. बीसीसीआय चांगल्या लोकांच्या हातात आहे. भारतीय क्रिकेट मजबूत आहे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो." 

बीसीसीआयची नवीन टीम 

  • अध्यक्ष - रॉजर बिन्नी 
  • उपाध्यक्ष - राजीव शुक्ला
  • सचिव - जय शाह
  • सरचिटणीस - देवजित सैकिया
  • खजिनदार - आशिष शेलार  

 रॉजर बिन्नी BCCIचे 36वे अध्यक्ष भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष झाले आहेत. रॉजर बिन्नी हे भारतातील पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहेत. 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ते महत्त्वाचा चेहरा होते. त्या विश्वचषकात त्याचे योगदान खूप महत्त्वाचे होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत प्रथमच विश्वचषकाचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे रॉजर बिन्नी या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज ठरले होते. या स्पर्धेत त्यांनी आठ सामन्यांत एकूण 18 बळी घेतले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बीसीसीआयसौरभ गांगुलीआशीष शेलारजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ
Open in App