IPL 2024: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीने राजीनामा देऊन या पदासाठी ऋतुराजचे नाव पुढे केले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची वर्णी लागली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले आहे. (CSK New Captain)
दरम्यान, कॅप्टन कूल धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाचवेळा ट्रॉफी जिंकली. याशिवाय सर्वाधिकवेळा अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणूनही चेन्नईच्या संघाची ख्याती आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा किताब जिंकवून दिला. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे.
चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद सांभाळणे ही अभिमानाची बाब आहे. खूप चांगले वाटत आहे, नक्कीच ही एक मोठी जबाबदारी आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. माही भाई, जड्डू भाई आणि अज्जू भाई (अजिंक्य रहाणे) हा देखील एक चांगला कर्णधार आहे. त्याने मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. खेळाचा आनंद घ्यायचा.