इंडियन प्रीमिअर लीगने भारताला अनेक युवा स्टार दिले. काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकले, तर काही काळाच्या आड गायब झाले. असाच एक स्टार ज्याने २०११ मध्ये मोहाली येथे महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची बेक्कार धुलाई केली होती. पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने ६३ चेंडूंत १२० धावांची वादळी खेळी केली होती. पण, त्यानंतर तो गायबच झाला अन् आज त्याचे नाव समोर येतेय तेही त्याने निवृत्ती जाहीर केली म्हणून... पॉल व्हॅल्थॅटी ( Paul Valthaty) याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांना व्हॅल्थॅटीने ईमेल द्वारे पत्र लिहिले. त्यात त्याने म्हटले की, "मी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची औपचारिक घोषणा करत आहे. अनेक संघांचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी खूप भाग्यवान आणि अभिमानास्पद आहे. माझ्या कारकिर्दीत इंडिया ब्लू इन द चॅलेंजर ट्रॉफी, भारत अंडर-१९ आणि मुंबई वरिष्ठ संघ आणि सर्व वयोगटातील संघांसह मी या संधीचा लाभ घेतला. BCCI आणि MCA यांचे आभार मानतो ज्यांनी मला आणि माझ्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना नेहमीच पाठिंबा दिला."
३९ वर्षीय व्हॅल्थॅटी हा आयपीएलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा पहिला फलंदाज आहे. त्याने ५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२० धावा केल्या आणि १ विकेटही घेतली. ५ लिस्ट ए सामन्यात त्याच्या नावावर ७४ धावा व १ विकेट आहे. त्याने ३४ ट्वेंटी-२० सामन्यांत ७७८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३ अर्धशतकांसह ११ विकेट्सचा समावेश आहे.
तो म्हणाला, मी आयपीएल आणि राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स ज्यांच्याकडून मी खेळलो, त्यांचे आभार मानतो. त्यांच्याकडून खेळण्याची संधी मिळणे, हे मी भाग्य समजतो. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा मी मुंबईचा पहिला आणि चौथा भारतीय फलंदाज होतो. पण, भारतीय संघाचे मला प्रतिनिधित्व करता आले नाही, हे मी दुर्दैव समजतो. २०११च्य़ा आयपीएलनंतर मला दुखापत झाली.''