नवी दिल्ली : कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. ज्याच्यातून असा दावा केला जात होता की पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान शिनवारीचा लाईव्ह सामन्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, खेळाडू मैदानावर सामना खेळत आहेत पण अचानक सगळेजण बाजूला पळू लागले. यानंतर व्हिडीओमध्ये एक खेळाडू जमिनीवर उलटा पडलेला दिसत आहे. ज्याच्या आसपास खेळाडू आणि इतर काही जमले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान शिनवारीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असल्याचा दावा केला जात होता. माहितीनुसार, हा सामना 25 सप्टेंबर रोजी पाकिस्तान कॉर्पोरेट लीग अंतर्गत लाहोरमधील प्रसिद्ध ज्युबली क्रिकेट मैदानावर खेळला जात होता. बर्जर पेंट्स आणि फ्रिजलँडचे संघ या सामन्यात आमनेसामने होते. ही घटना घडली तेव्हा बर्जर पेंट्सचा संघ फलंदाजी करत होता. त्यानंतर मैदानावरील फ्रिजलँडचा फिल्डर (उस्मान शिनवारी) अचानक जमिनीवर कोसळला.
शिनवारीने व्यक्त केला संताप शिनवारीच्या मृत्यूची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शिनवारी चांगलाच संतापला. ही अफवा असल्याचे सांगताना त्याने म्हटले, "मी ठीक आहे, माझ्या कुटुंबीयांना माझ्या मृत्यूबाबत फोन येत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात, कृपया एवढी मोठी बातमी चालवण्यापूर्वी खात्री करून घ्या. धन्यवाद." अशा शब्दांत शिनवारीने खोटी बातमी पसरवल्यामुळे माध्यमांवर टीका केली.
शिनवारीने 2013 मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध फक्त एक षटक टाकले होते. यानंतर पुढील सामन्यात शिनवारीला पूर्ण 4 षटके देण्यात आली. ज्यात त्याने 52 धावा दिल्या. तसेच डिसेंबर 2019 मध्ये त्याची श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली होती. त्याने 11 डिसेंबर 2019 रोजी श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या संघाकडून कसोटीमध्ये पदार्पण केले.