नवी दिल्ली - सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आशिष नेहराने भारतीय क्रिकेटचे भवितव्य पुढच्या सहा ते सातवर्षांसाठी सुरक्षित हातांमध्ये असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्ध करीयरमधील शेवटचा सामना खेळल्यानंतर पत्रकारपरिषदेत बोलताना नेहरा भावूक झाला होता. यापुढे मला भारताकडून क्रिकेट खेळता येणार नाही. ही उणीव मला प्रकर्षाने जाणवेल. तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी निवृत्त होण्याची संधी मिळते यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट असू शकत नाही असे मला वाटते. निश्चित हा भाग्याचा क्षण आहे असे नेहराने सांगितले.
नेहरा मूळचा दिल्लीचा असून काल दिल्लीच्या फिरोझशहा कोटला मैदानावर तो अखेरचा सामना खेळला. मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत खेळात बरेच बदल झाले आहेत. भारतीय क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित हातांमध्ये आहे असे मत व्यक्त करुन नेहराने एकप्रकारे विराटचे कौतुकही केले. 1999 साली श्रीलंकेविरुद्ध नेहरा पहिला कसोटी सामना खेळला. जेव्हा जेव्हा संघाला माझी गरज भासली तेव्हा तेव्हा मी माझ्यापरीने सर्वोत्तम प्रदर्शन केले असे नेहराने सांगितले. शेवटच्या सामन्यात नेहराने तीन षटकात 29 धावा दिल्या पण एकही गडी बाद करता आला नाही.
भारताच्या महान खेळाडूंमध्ये, आघाडीच्या गोलंदाजांमध्ये आशिष नेहराचा समावेश कधीच झाला नाही. स्वत: नेहरानेही तशी अपेक्षा केली नसेल. चांगली गुणवत्ता असुनही सततच्या दुखापतींमुळे नेहराची कारकीर्द म्हणावी तशी बहरली नाही. 18 वर्षांच्या काळात जवळपास 12 शस्रक्रिया झेलूनही नेहराने क्रिकेटच्या मैदानातील आपले स्थान कायम राखले. 1999 साली पहिल कसोटी सामना खेळणाऱ्या आशिष नेहराला कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द फार बहरू शकली नाही. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र त्याने आपली उपयुक्ततता वेळोवेळी सिद्ध केली.
आशिष नेहराचे नाव आले की, 2003 च्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धची साखळी लढत नरजेसमोर यायलाच हवी. नासिह हुसेन, मायकेल ट्रेस्कोस्ट्रिक, अँड्यू फ्लिंटॉफ अशा फलंदाजांसमोर नेहराने आपल्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय स्पेल टाकला होता. त्या लढतीत टिपलेले 23 धावांत 6 बळी ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.