मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक धावा आणि शतकी वर्ल्ड रेकॉर्डचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मुद्यावरून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या अन् भारताविरुद्ध रोष बाळगणाऱ्या इंग्लिश जंटलमनला लिटल मास्टर सुनील गावसकरांनी आक्रमक अंदाजातील फटकारले आहे. अरे'ला 'का रे' करायला हवं, त्यांना तीच भाषा कळते; अशा शब्दांत गावसकरांनी इंग्लिश मॅनची शाळा घेतलीये. इथं जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण? गावसकर एवढे का आणि कुणावर भडकले आहेत? यासंदर्भातील सविस्तर माहिती
काय आहे नेमकं प्रकरण? गावसकर एवढं कुणावर अन् का भडकले?
इंग्लिश मीडियामध्ये सध्या जो रुट हा येत्या काळात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मागे टाकेल, याची जोरदार चर्चा सुरु आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन जो नेहमी भारतीय क्रिके टसंघाच्या विरोधात 'बोलंदाजी' करत असतो, त्याने यावर मजेशीर अंदाजात कमेंट केली होती. एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये मायकल वॉन मजेशीर अंदाजात म्हणाला होता की, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर असलेल्या रुटसाठी बीसीसीआय अडथळे निर्माण करु शकतो. त्याच्याविरोधात कट शिजू शकतो. गावसकरांना ही कमेंट चांगलीच खटकली आहे. यावरून त्यांनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले आहेत गावसकर?
गावस्करांनी स्पोर्टस्टारला लिहिलेल्या स्तंभलेखातून इंग्लंडच्या माजी कर्णधारावर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलंय की,
नुकतेच कोणी तरी अस म्हटल्याचं ऐकलं की, जो रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडला तर ती कसोटी क्रिकेटसाठी एक चांगली गोष्ट ठरेल. कृपया मला सांगा सध्या कसोटी क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड सचिनच्या नावे असल्यामुळं काय चुकीचं घडंतय? हा रेकॉर्ड इंग्लिश बॅटरच्या नावे झाल्यावर काय चांगल होईल?
संदर्भासह स्पष्टीकरण देत गावसकरांनी मायकेल वॉनला हाणला टोला
गावसकरांनी आपल्या लेखामध्ये ५० वर्षांच्या अनुभवाचा दाखला देत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. संघाच्या खराब कामगिरीनंतर फक्त भारतीय चाहतेच गप्प होत नाहीत. क्रिकेट जगतातील कोणत्याही संघाच्या चाहत्यांची अवस्था या परिस्थितीत तशीच असते. भारतीय संघ परदेशात दमदार कामगिरी करतो त्यावेळी संघाला प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचा आवाजही बुलंद असतो. याच कारण लांब पल्ल्याचं अंतर पार करून हे चाहते संघाला प्रोत्साहन देण्यासाठी तिथं पोहचलेले असतात. पुढच्या वेळी काही समालोचक किंवा परदेशी मीडियाने भारताच्या खराब कामगिरीनंतर चाहते शांत का होतात? असा प्रश्न विचारला तर त्याचे चाहते प्रोत्साहन द्यायला का येत नाहीत ते विचारा. भारतावर टीका करणाऱ्या मंडळींना आक्रमक अंदाजातच फटकारले पाहिजे. कारण त्यांना हीच भाषा कळते, असा टोलाही गावसकरांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला लगावला आहे.