नवी दिल्ली - 2019 मध्ये निवडणुका कधी होणार, याची उत्सुकता केवळ राजकीय पक्षांनाच लागलेली नाही. या निवडणुकांच्या तारखांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (BCCI) आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला कारणही तसेच आहे. निवडणुकीच्या तारखांवर इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) बाराव्या मोसमाचे भवितव्य अवबंलून आहे. निवडणूक आणि आयपीएल यांच्या तारखांची सांगड घालण्यासाठी बीसीसीआयने तीन पर्याय तयार ठेवले आहेत.
2009 आणि 2014 च्या मोसमातही असाच पेचप्रसंग आला होता आणि त्यावेळी आयपीएलचे सामने परदेशात हलवण्यात आले होते. 2009ची आयपीएल दक्षिण आफ्रिका आणि 2014ची आयपीएल संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवण्यात आली होती. त्यामुळे 2019 साली होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता पुढील वर्षी आयपीएल दक्षिण आफ्रिका किंवा युएई येथे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसरा पर्याय असा की सामने दोन विविध देशांत खेळवले जाऊ शकतील.
आयपीएलच्या 12व्या मोसमासाठी इंग्लंडचाही विचार करण्यात आला होता, परंतु तेथील होणारा खर्च हा आवाक्याबाहेर आहे. बीसीसीआयने हे तिन्ही पर्याय प्रशासकीय समितीसमोर ठेवले आहेत आणि राहुल जोहरी हे बीसीसीआयचे व्यवस्थापकीय प्रमुख आहेत. फ्रँचायझींचा कल हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने अधिक असल्याचे बोलले जात आहे. युएईमध्ये तीनच मैदानं आहेत आणि त्यावर आयपीएलचे सर्व सामने खेळवणे अशक्य बाब आहे.
लोढा शिफारसींच्या अंमलबजावणीनंतर निर्णयआयपीएलच्या पुढील मोसमाच्या तारखांबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासकीय समिती लोढा शिफारशींच्या योग्य अंमलबजावणीसाठी आग्रही आहे. त्यामुळे त्यांना आयपीएलच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही.
विश्वचषकामुळे आयपीएलच्या वेळापत्रकात बदलपुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमुळेही बीसीसीआयला आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. आयपीएल स्पर्धा नियोजित महिन्यापेक्षा थोडी आधी घेण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्याऐवजी ही लीग मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होईल, असे कळत आहे.