पाकिस्तानला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या आयोजनाचे यजमानपद ICC ने दिले खरे, परंतु ही स्पर्धा तिथे होईलच याची खात्री नाही. पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीची तारीख समोर आली आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या २० दिवसांच्या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. २०१७ नंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे, परंतु ही स्पर्धा ५० षटकांची खेळवायची की ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. २०१७ मध्ये पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्याचे अचूक दिवस अद्याप निश्चित झालेले नसले तरी, या २० दिवसांच्या कालावधीत वेळापत्रक फिट केले जाईल. २०१७ च्या आवृत्तीत १९ दिवसांची विंडो होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तात्पुरत्या तारखा वरवर पाहता २० दिवसांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करण्याचा आयसीसीचा प्रयत्न असेल. IL T20 ची तिसरी आवृत्ती ११ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल, त्याच दरम्यान दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगचा तिसरा हंगाम पार पडणार आहे. SA20 चे तिसरे पर्व ९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत पार पडेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आल्याने, पाकिस्तानबाबतचे सध्याचे धोरण कायम राहण्याची अपेक्षा आहे. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केले गेले नाही. हेच धोरण राहिल्यास, गेल्या वर्षीच्या आशिया चषकासाठी वापरलेले हायब्रिड मॉडेल येथेही लागू होऊ शकते आणि त्यानुसार भारताचे सामने यूएईमध्ये खेळवले जाऊ शकतात.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही हे निश्चित आहे. येत्या दोन महिन्यांत आम्हाला काही कल्पना येईल, असे एका जाणकार सूत्राने सांगितले. जुलैमध्ये कोलंबो येथे आयसीसीच्या वार्षिक परिषदेत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.