Join us

VIDEO: ना वाढदिवस, ना विजय; तरीही ड्रेसिंग रूममध्ये सचिनचं जंगी सेलिब्रेशन अन् केक कटिंग, कारण...

Sachin Tendulkar Celebration Video: सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 19:43 IST

Open in App

Sachin Tendulkar Celebration: सचिन तेंडुलकर सध्या मास्टर्स लीग स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो इंडिया मास्टर्स संघाचे नेतृत्व करत आहेत. या लीगदरम्यान सचिनसोबत सिक्सर किंग युवराज सिंगदेखील खेळत आहे. ड्रेसिंग रूममध्ये सचिन आणि युवराज असेल की तेथील वातावरण खूपच उत्साही असणार यात वाद नाही. पण आज या संघाचा कुठलाही सामना नव्हता, कुणाचाही वाढदिवस नव्हता तरीही ड्रेसिंग रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन झाले. सचिन तेंडुलकर साठी टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यासोबतच केक कटिंगही झाले. जाणून घेऊया नेमकं काय होतं सेलिब्रेशनचं कारण.

सेलिब्रेशनमागचं खास कारण

२४ फेब्रुवारी हा दिवस क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी खूप खास आहे. या दिवशी तो वनडे सामन्यात द्विशतक करणारा पहिला खेळाडू ठरला. आज, म्हणजे २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्या ऐतिहासिक क्षणाला १५ वर्षे पूर्ण झाली. सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध हा पराक्रम केला होता. या लीगमध्ये सचिनला खेळाडूंनी छान सरप्राईज दिलं.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये सचिन तेंडुलकरने आज सराव केला. नेट्समध्ये प्रॅक्टिस पूर्ण केल्यानंतर सचिन ड्रेसिंग रूममध्ये परत आला. त्यावेळी युवराज सिंगसह इतर सर्व खेळाडूंनी त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले आणि केक कापायला सांगितला. युवराजने आधी सचिनचे कौतुक केले आणि मग के कटिंग झाले. सचिनने या सर्व खेळाडूंचे आभार मानले. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, 'खूप जास्त प्रेमाने भरलेले एक छान सरप्राईज!' सचिनचा हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

दरम्यान, या लीग स्पर्धेत सचिन ज्याप्रकारे बॅटिंग करतोय, त्यावरून तो अप्रतिम फॉर्मात असल्याचे दिसत आहे. चाहते त्याच्या खेळीचे आजच्या घडीलाही तोंडभरून कौतुक करत आहेत.

टॅग्स :सचिन तेंडुलकरयुवराज सिंगसोशल मीडिया