वेस्ट इंडिज संघाला भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करता आली नाही. त्या अपयशातून धडा घेत त्यांनी घरच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत बाजी मारली. आता २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे संयुक्त यजमान असलेल्या वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी कंबर कसली आहे आणि त्यांना इंग्लंडविरुद्ध ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. पण, या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने देऊ केलेला करार नाकारला आहे. आयपीएल सारख्या व्यावसायिक लीगसाठी दोन माजी कर्णधारांसह तिघांनी हा करार नाकारल्याचे बोलले जात आहे.
क्रिकेट बोर्डाने २०२२ ते २०२३ या कालावधीतील कामगिरी लक्षात घेता हे करार दिले आहेत. निवड समितीने शिफारस केलेल्या या नावांना बोर्डाच्या संचालकांनी ते मान्य केले आहेत. डावखुरा फिरकीपटू गुदाकेश मोती, फलंदाज केसी कार्टी, तागेनरीन चंद्रपॉल व एलिस अथानाझे याना पहिल्यांदा केंद्रीय करार मिळाला आहे, तर महिला खेळाडूंमध्ये झैदा जेम्स व शेनेता ग्रिमोंड ही दोन नवीन नावं आहेत. मात्र, निकोलस पूरन, जेसन होल्डर व कायले मेयर्स या स्टार खेळाडूंनी करार नाकारला आहे. पण, ते ट्वेंटी-२० संघाच्या निवडीसाठी उपलब्ध असतील, असे त्यांनी बोर्डाला कळवले आहे. पूरन व होल्डर यांनी विंडीज संघाचे नेतृत्वही केले आहे.
खेळाडूंची यादी वेस्ट इंडिज पुरुष - एलिक अथानेझ, क्रेग ब्रेथवेट, केसी कार्टी, तागेनरीन चंद्रपॉल, जोशुआ डा सिल्वा, शे होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, गुदाकेश मोती,रोव्हमन पॉवेल, केमार रोच, जेडन सील्स, रोमारिओ शेफर्ड