श्रीलंका : दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकावर षटकार खेचला आणि भारताने निदाहास ट्रॉफीला गवसणी घातली. पण या स्पर्धेत सर्वात जास्त गोष्ट गाजली असेल तर ती म्हणजे ' नागीन डान्स'. या मालिकेत सुरुवातीला खेळाडूंनी ' नागीन डान्स' डान्स केला होता. पण आता तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तर समालोचन करताना ' नागीन डान्स' केल्याचे समोर आले आहे.
अंतिम सामन्यात अखेरच्या दोन षटकात विजयासाठी 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडूत नाबाद 29 धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध चार गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी20 तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले. दिनेश कार्तिकने केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर भारताने निदाहास चषक पटकावला.
या मालिकेत बांगलादेशच्या खेळाडूंना डिवचण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी ' नागीन डान्स' केला होता. पण या स्पर्धेच्या साखळीतीली दोन्ही सामन्यांत श्रीलंकेला बांगलादेशवर विजय मिळवता आला नाही. अखेरच्या साखळी सामन्यातही श्रीलंकेच्या खेळाडूने बांगलादेशच्या मुशफिकर रहिमला ' नागीन डान्स' करून डिवचले होते. पण रहिमने बांगलादेशला हा सामना जिंकवून दिला आणि त्यानंतर रहिमसह बांगलादेशच्या पूर्ण संघाने ' नागीन डान्स' केला.
अंतिम सामन्यातही ' नागीन डान्स' चा अतिरेक होईल, असे वाटत होते, पण तसे घडले मात्र नाही. भारताच्या शिखर धवनने एकदा ' नागीन डान्स'ची पोझ करून दाखवली खरी, पण त्यामुळे कोणताही वाद झाला नाही. खेळाडू मैदानात ' नागीन डान्स' करत होते, ते सारे पाहतही होते. पण भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर समालोचन कक्षात ' नागीन डान्स' करतील, असे कुणालाही वाटले नसेल, पण असे मात्र अंतिम फेरीत घडले आहे.
बांगलादेशने अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे 167 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली होती. पण समालोचन कक्षात रंगत आली ती दहाव्या षटकात. बांगलादेशचा रुबेल होसेन दहावे षटक टाकण्यासाठी सज्ज होता. रोहित शर्मा तेव्हा स्ट्राईकवर होता. रुबेलच्या पहिल्याच चेंडूवर रोहितने चौकार लगावला. तो चौकार पाहून समालोचन कक्षात असलेल्या गावस्कर यांना काय झाले कुणास ठाऊक? रोहितने चौकार मारल्यावर गावस्कर उभे राहीले आणि त्यांनी चक्क ' नागीन डान्स' केला. त्यांचा हा ' नागीन डान्स' पाहून समालोचन कक्षातल्या ब्रेट ली यालाही हसू आवरता आले नाही.