कोलंबो : निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेचा अखेर सामना आता साऱ्यांपुढे येऊन ठेपलेला आहे. रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. अंतिम फेरीत बांगलादेशला पराभूत करून विजयाची गुढी उभारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे. दुसरीकडे अनपेक्षितपणे अंतिम फेरीतील स्थान कमावणाऱ्या बांगलादेशलाही यावेळी कमी लेखून चालणार नाही.
या स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी सर्वात उजवी ठरली आहे. भारताला पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर मात्र तीन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवत भारताने सहजपणे अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या फलंदाजीमध्ये शिखर धवनकडून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये त्याने 188 धावा केल्या आहेत. स्पर्धेतील चौथ्या सामन्यामध्ये भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळी साकारली होती. त्याचे शतक हुकले होते. पण त्याची खेळी डोळ्याचे पारणे फेडणारी नक्कीच होती. आतापर्यंत या स्पर्धेत त्याने 117 धावा केल्या. आहेत. सुरेश रैनाला आतापर्यंत मोठी खेळी साकारता आली नसली तरी त्याने प्रत्येक सामन्यात उपयुक्त खेळी साकारल्या आहेत. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये त्याने सात बळी मिळवले आहेत. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर महागडा ठरला होता. पण त्यानंतर मात्र त्याने दमदार पुनरागमन करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता. चार सामन्यांमध्ये त्याच्या नावावर सहा बळी आहेत. जयदेव उनाडकट आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी पाच बळी मिळवले आहेत.
श्रीलंकेला पराभूत करत अंतिम फेरीत पोहोचल्याने बांगलादेशचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. ते ज्यापद्धतीने खेळत आहेत, ते पाहता त्यांनी जर जेतेपद पटकावले तर कुणालाही नवल वाटणार नाही. कारण त्यांनी या स्पर्धेत यजमान श्रीलंकेला दोन्ही वेळा पराभूत केले आहे. 216 या धावसंख्येचा त्यांनी लीलया पाठलाग केला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी मिळालेल्या विजयानंतर त्यांच्यातील आक्रमकपणा वाढला असेल आणि त्याचा त्यांना अंतिम फेरीत फायदाही होऊ शकतो. बांगलादेशच्या मुशफिकर रहिमने 95च्या सरासरीने फलंदाजी करताना 195 धावा केल्या आहेत, तर तमीम इक्बालच्या खात्यात 139 धावा आहेत. शकिब अल हसन आणि महमदुल्लाहसारखे गुणी अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे आहेत.