कोलंबो : भाराताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याचबरोबर बरेच विक्रमही त्याच्या नावावर आहेत. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे जवळपास सर्वच विक्रम कोहली मोडेल, अशी भाकीतं बऱ्याच जणांनी वतर्वलीदेखील आहेत. पण सध्याचा घडीला कोलहीचाच एक विक्रम भारताच्या एका फलंदाजाने मोडला आहे आणि तो फलंदाज आहे शिखर धवन.
मंगळवारी निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेला सुरुवात झाली. श्रीलंकेच्या पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही, यामध्ये अपवाद ठरला तो धवन. कारण धवनने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 90 धावांची तडफदार खेळी साकारली. यावेळी ट्वेन्टी-20 क्रिकेटमधले त्याचे पहिले-वहिले शतक दहा धावांनी हुकले होते. धवनला यावेळी अन्य फलंदाजांती अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला 174 धावा करता आल्या होत्या. या सामन्यात भारताला पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या लढतीत भारताचा डाव अडचणीत सापडला होता. कर्णधार रोहित शर्माला तर भोपळाही फोडता आला नव्हता, तर सुरेश रैनाला एकच धाव करता आली होती. भारताची त्यावेळी 2 बाद 9 अशी अवस्था होती. धवनने या परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी चोख निभावली होती.
धवनने या सामन्यात 90 धावांची खेळी साकारत कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 लढतीत भारताकडून सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम कोहलीच्या नावावर होता. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध यापूर्वी 82 धावांची खेळी साकारली होती. पण धवनने 90 धावा करत कोहलीचा हा विक्रम मोडीत काढला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 लढतीतील सर्वोत्तम धावसंख्या आता धवनच्या नावावर असली तरी त्यानंतरच्या तिन्ही सर्वोत्तम खेळी कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध 82, 78* आणि 68 अशा धावा केल्या आहेत.