कोलंबो : श्रीलंकेतील निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली होत होती, त्यामुळेच त्याला भारतीय संघात स्थानही दिले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 लढतीत त्याला बळी मिळाला नाही. पण त्याची गोलंदाजी मात्र चांगली झाली. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला संधी दिली. त्याच्या पहिल्याच षटकात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली बळी मिळवण्याची संधी होती, पण क्षेत्ररक्षकामुळे ती हुकली. पण त्यानंतरही तो सामनावीर ठरला.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत होता. या सामन्यातील सातवे षटक टाकण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने या युवा गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द केला. या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर बांगलादेशच्या लिटॉन दासचा झेल उडाला. भारतीय संघातील सर्वात चांगला क्षेत्ररक्षक असलेला सुरेश रैना तो झेल टिपण्यासाठी पुढे सरसावला, पण त्याच्या हातून हा झेल सुटला. या षटकाच्याच पाचव्या चेंडूवर दासचाच झेल पुन्हा एकदा उडाला होता. पण यावेळी वॉशिंग्टन सुंदरनेही झेल सोडला. आपल्याला पहिला बळी मिळत नाही, असा विचार करून विजय शंकर हा निराश झाला नाही.
बांगलागेशचा मुशफिकर रहिम हा चांगली फटकेबाजी करत होता. त्याला विजयने बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह यालाही विजयने तंबूचा रस्ता दाखवला. बांगलादेशचे हे दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद केल्यामुळे विजयला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दोन झेल सुटल्यामुळे विजय निराश झाला नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये तो म्हणाला की, " क्रिकेट हा खेळ आहे. त्यामध्ये झेल सुटण्याच्या गोष्टी घडत असतात. कुणीही मुद्दामून या गोष्टी करत नाही. त्यामुळे या साऱ्या गोष्टींचा मी जास्त विचार करत नाही."