कोलंबो : कर्णधार रोहित शर्माच्या दमदार नाबाद 89 धावा आणि सुरेश रैनाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत भारताला बांगलादेशपुढे 177 धावांचे आव्हान ठेवता आले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी 9.5 षटकांत 70 धावांची सलामी दिली. भारताची सुरुवात संथ गतीने झाली होती. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र रोहित आणि धवन या दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. रुबेल होसेनने धवनला त्रिफळाचीत करत भारताला पहिला धक्का दिला. धवनने 27 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 35 धावा केल्या.
धवन बाद झाल्यावर रैना फलंदाजीला आला आणि त्याने आपल्या शैलीत सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. रोहित अर्धशतक झळकावण्यापर्यंत संयतपणे फलंदाजी करत होता. 42 चेंडूंमध्ये रोहितने ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील तेरावे अर्धशतक पूणे केले. अर्धशतक पूर्ण केल्यावर मात्र रोहितने आक्रमक फलंदाजी केली.
13 व्या षटकात भारताची 1 बाद 93 अशी स्थिती होती. त्यावेळी भारत आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकेल का, याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. पण त्यानंतर रैना आणि रोहित या दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण चढवले. अबु हैदरच्या 18व्या षटकात या दोघांनी मिळून तीन षटकारांसह 21 धावांची लूट केली. रैनाने 30 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 47 धावांची दमदार खेळी साकारली. रोहितने 61 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 89 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.