कोलंबो : श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत बुधवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना सुरु होता. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीतील स्थान निश्चित करू पाहत होता, तर दुसरीकडे बांगलादेशचा संघही हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारण्याच्या तयारीत होता. पण यावेळी जेव्हा बांगलादेशचा संघ मैदानात उतरला तेव्हा त्यांच्या प्रत्येक खेळाडूने काळ्या रंगाची फित आपल्या टी-शर्टला बांधली होती.
निदाहास ट्रॉफीतील पाचवा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये खेळला जात आहे. यावेळी बांगलादेशच्या खेळाडूंनी काळी फित बांधली होती. या गोष्टीचे कारण म्हणजे, 12 मार्चला नेपाळमध्ये युएस-बांग्ला एयरलाइंसच्या विमानाला अपघात झाला होता. या दुर्घटनेमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले होते. या विमानात एकूण 67 प्रवासी होते.
बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने याबाबत सांगितले की, " आमचा संघ सध्या श्रीलंकेमध्ये निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धा खेळत आहे. नेपाळमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवी असाच होता. या अपघातामधील मृतांना आम्ही श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बुधवारी होणाऱ्या सामन्यात आमचे खेळाडू टीशर्टवर काळी फित बांधून उतरणार आहे. "