मुंबई : श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या निदाहास ट्रॉफीचा थरारक शेवट साऱ्यांनीच पाहिला. दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला आणि भारताने जेतेपदाला गवसणी घातली. पण या मालिकेचे फलित काय? कोणत्या संघाने काय कमावले आणि काय गमावले, यावर हा एक दृष्टीक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न.
ही मालिका खऱ्या अर्थाने गाजवली ती बांगलादेशने. त्यांना जेतेपद पटकावता आले नाही, पण आतापर्यंतची त्यांची कामगिरी पाहली तर या स्पर्धेत त्यांनी कमाल केली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही भारतीयांना तर बांगलादेश जेतेपदाच्या लायक आहे, असेही वाटत होते. याचे कारण म्हणजे त्यांनी केलेला खेळ. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी 214 धावांचा पाठलाग केला. त्यावेळीच त्यांनी बांगलादेशला गंभीरपणे घ्यायला हवे होते. पण श्रीलंकेने पहिल्या पराभवानंतरही बांगलादेशविरुद्ध गंभीरपणे खेळ केला नाही, ते त्यांना डिवचण्यातच धन्यता मानत होते. पण बांगलादेशने श्रीलंकेला दुसऱ्या सामन्यातही धूळ चारली. मुशफिकर रहिम, शकिब अल हसन, महमुदुल्लाह, मुस्ताफिझूर यांची कामगिरी प्रभावी ठरली. अंतिम सामन्यातही त्यांनी काही काळ वर्चस्व गाजवले, पण जेतापदाची माळ त्यांच्या नशिबातच नव्हती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी जो काही राडा घातला, त्याचे समर्थन करता येणार नाही, पण त्यांच्यामध्ये खदखदत असलेला राग यावेळी बाहेर आला. आपली कुवत वाढली, आपण विजयासमीप आहोत, पण तरीही आपल्या विजयात काही व्यक्ती अडथळा आणत आहेत, याची चीड त्यांना आली होती. तो राग त्यांनी व्यक्त केला. पण या मालिकेनंतर कुणीही बांगलादेशला कच्चा लिंबू तरी नक्कीच समजणार नाही. दहा वर्षांपूर्वीची प्रतिमा त्यांनी नक्कीच पुसलेली आहे. त्यांनी केलेला नागीन डान्स यावेळी चांगलाच गाजला.
भारताच्या या स्पर्धेत चांगली कामगिरी झाली. शिखर धवन चांगल्या फॉर्मात होता. वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, विजय शंकर या युवा खेळाडूंकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्यामुळे यांच्यापैकी काही खेळाडूंचा विचार 2019च्या विश्वचषकासाठी नक्कीच होऊ शकतो. पण या मालिकेत रीषभ पंतला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. दिनेश कार्तिकने ते करून दाखवले. या संघाला स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सामना सामना जिंकणे अवघड वाटत होते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांनी धावांचा पाठलाग करण्यावर भर दिला आणि त्यामध्ये ते शंभर टक्के यशस्वी ठरले. कर्णधार रोहित शर्माचा अंतिम सामन्यात कार्तिकच्या पुढे विजय शंकरला पाठवण्याचा निर्णय पचवी पडला नाही. जर कार्तिकने तो षटकार खेचला नसता तर रोहितवर कडाडून टीका झाली असती.
श्रीलंकेच्या संघाला या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कुशल परेरा, कुशल मेंडिस यांची नावं या स्पर्धेत चर्चेला आली. त्यांनी चांगली कामगिरीही केली, पण अन्य खेळाडूंनी मात्र निराशच केले. बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. जर श्रीलंकेच्या कामगिरीला अशीच उतरती कळा लागली तर त्यांची अवस्था वेस्ट इंडिजसारखी व्हायला वेळ लागणार नाही.