नवी दिल्ली : विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध तिसºया आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर आज शनिवारपासून सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज असतील.
नागपुरात दुसºया कसोटीत एक डाव २३९ धावांनी विजय मिळवित भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. याआधी ओळीने आठ मालिका जिंकण्याची कामगिरी विराटच्या संघाने केली. कोटलावर सामना बरोबरीत राहिला तरीही सलग नऊ सामने जिंकण्याच्या आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या विक्रमाशी भारत बरोबरी करेल. भारताने २०१४-१५ मध्ये आॅस्ट्रेलियात मालिका गमविली होती. तेव्हापासून भारताने नऊ मालिका खेळल्या व सलग आठ जिंकल्या. मायदेशात पाच तसेच श्रीलंकेत दोन व वेस्ट इंडिजमध्ये एक मालिका विजय साजरा केला. भारताने मागील २३ पैकी तब्बल १९ कसोटी सामने जिंकले. एकमेव सामना गमावला तो आॅस्ट्रेलियाविरुद्ध. द. आफ्रिका दौºयापूर्वी हा अखेरचा कसोटी सामना असेल्याने कोहलीच्या इच्छेनुसार कोटलाची खेळपट्टी हिरवीगार ठेवण्यात येत आहे. ईडन गार्डनवरील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज तर नागपुरात फिरकीपटू प्रभावी ठरले होते. तिसºया सामन्यात पाच की चार गोलंदाज खेळवावे याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापन द्विधा मन:स्थितीत आहे. पाच गोलंदाज खेळविण्याचा निर्णय झाल्यास उपकर्णधार अजिंक्य रहाणेला बाहेर बसावे लागेल. तीन डावांत तो एकदाही दुहेरी आकडा गाठू शकला नव्हता. दुसरीकडे वर्षभराहून अधिक काळ बाहेर बसलेल्या रोहित शर्माने नागपुरात शतक ठोकले होते.(वृत्तसंस्था)
आकडे काय सांगतात...
भारत मागील ३० वर्षांत कोटलावर अपराजित आहे. येथील ११ पैकी १० सामने भारताने जिंकले. येथे झालेल्या एकूण ३३ पैकी १३ सामन्यात विजय, सहा सामन्यात पराभव आणि १४ सामन्यात बरोबरी अशी आकडेवारी आहे.
भारताने येथे नोव्हेंबर १९८७ ला वेस्टइंडिजविरुद्ध सामना गमवला. लंकेने या मैदानावर डिसेंबर २००५ ला केवळ एक सामना खेळला असून भारताकडून त्यांचा १८८ धावांनी पराभव झाला.
कोहलीने या सामन्यात आतापर्यंत तीन डावांत दुहेरी शतकासह ३१७ धावा ठोकल्या. २५ धावा केल्यास त्याच्या पाच हजार कसोटी धावा पूर्ण होतील. ६२ सामन्यात ४९७५ धावा करणारा विराट अशी कामगिरी करणारा ११ वा भारतीय ठरेल. रहाणेला तीन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १८५ धावांची गरज आहे.
हा सामना जिंकून कोहली गांगुलीपाठोपाठ दुसरा यशस्वी कर्णधार बनू शकतो. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने ४९ पैकी
२१ तर विराटच्या नेतृत्वात ३१ पैकी २० सामने जिंकले आहेत. धोनीने ६० पैकी २७ सामन्यात विजय मिळवून दिला.
कोटलाची खेळपट्टी जामठ्यासारखीच
तिस-या कसोटीसाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी नागपूरच्या खेळपट्टीसारखीच असल्याचे मत पाहुणा कर्णधार दिनेश चांदीमल याने व्यक्त केले. द. आफ्रिका दौºयासाठी भारतीय संघाने हिरवीगार खेळपट्टी तयार करण्याची मागणी केली होती.
नागपुरात जामठ्याच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले होते. कोटलाच्या खेळपट्टीबद्दल मुरली विजयने ही चांगली खेळपट्टी असून गवत असल्याचे सांगितले. कोलकाता येथील ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज प्रभावी ठरले होते. कोटलाच्या खेळपट्टीची स्थिती नागपूरसारखीच होईल, असे जाणकारांचे मत आहे.
राहुल, धवनमुळे लाभ झाला : विजय
लंकेविरुद्ध तिसºया कसोटीत खेळण्यास तीन सलामीवीर सज्ज आहेत. तिघेही फॉर्ममध्ये असल्याने कुणाला बाहेर बसवावे, यासाठी संघ व्यवस्थापनाला डोके खाजवावे लागत आहे. ज्येष्ठ सलामीवीर मुरली विजयने मात्र लोकेश राहुल आणि शिखर धवन हे मैदानाबाहेर चांगले मित्र असल्याने अशा परिस्थितीवर तोडगा काढण्यास त्रास जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
या दोघांपासून आपल्याला बरेच शिकायला मिळाल्याचे सांगून विजय म्हणाला,‘मागच्या सामन्यात धवनने वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतला तेव्हा मी पुनरागमन करीत १२८ धावांची खेळी केली होती. कोटलावर राहुल किंवा धवन यापैकी एकजण बाहेर बसेल, असे मानले जात आहे. आम्ही अशा गोष्टी सहजपणे घेत असल्याने त्रास जाणवत नाही. अशी स्थिती आली की संवादातून एकमेकांना माहिती पुरवितो.
संघ व्यवस्थापनाचा निर्णय खेळाडूंसाठी सर्वतोपरी असतो.’ विजयने ५२ कसोटीत दहा शतकांसह ३५३६ धावा केल्या आहेत. विजयने द. आफ्रिका दौºयापूर्वी फिटनेस आणि कौशल्य विकासावर भर देणार असल्याचे सांगितले.
आमची भिस्त फलंदाजांवर : चांदीमल
‘‘यजमान संघाला टक्कर द्यायची झाल्यास फलंदाजांना सांघिक कामगिरी करावी लागेल. दुसºया कसोटीतील पराभव मनस्ताप देणारा ठरला. फलंदाजांनी पहिल्या डावात धावसंख्येला आकार देणे गरजेचे आहे. सामन्यात चुरस आणायची झाल्यास ३५० वर धावा उभाराव्या लागतील. मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत युवा फलंदाजांची परीक्षा राहील. मैदानावर आमचे डावपेच फसवे ठरल्याने पराभवाचे तोंड पहावे लागले. आम्ही येथे कधीही कसोटी सामना जिंकलेला नाही. पण दिल्लीत विजय मिळू शकतो याबद्दल मी आशावादी आहे. त्यासाठी सांघिक योगदान देण्याची गरज असेल.’’
पुजाराला करारात अव्वल श्रेणी मिळावी : रवी शास्त्री
नवी दिल्ली: कसोटीतील तज्ज्ञ फलंदाज मानला जाणारा चेतेश्वर पुजारा याला बीसीसीआयतर्फे देण्यात येणाºया केंद्रीय करारात अव्वल श्रेणी मिळायला हवी, असे मत मुख्य कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. पुजाराचा समावेश सध्या करार पद्धतीच्या अ श्रेणीत कोहली, धोनी, अश्विन, रहाणे आणि विजय यांच्यासोबत आहे.
राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमॉक्रसी इलेव्हन’ या पुस्तकावरील चर्चेत सहभागी झालेले शास्त्री म्हणाले,‘पुजाराला करारात अव्वल श्रेणी मिळायला हवी. एका कॅलेंडर वर्षांत सर्व प्रकारात खेळाडू किती सामने खेळला यावर श्रेणी निश्चित व्हावी. पुजारा कसोटी क्रिकेटमधील संघाचा आधारस्तंभ आहे.
तो अन्य प्रकारात अधिक सामने खेळत नाही. शिवाय आयपीएलचा करार त्याला मिळालेला नाही.’धोनी आणि कोहली हे एकमेकांचा फार आदर करीत असून भारतीय संघाच्या यशाचे हे देखील एक मोठे कारण असल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले.
मी कधी धोनीला रागावताना पाहिलेले नाही. कोहली शिकण्याच्या स्थितीत असला तरी परिपक्व आहे. धोनी-कोहलीबाबत रोज अफवा पसरतात. पण यात तथ्य नाही. एकमेकांचा दोघे किती सन्मान करतात हे मी पाहत असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.
उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, लोकेश राहुल, ईशांत शर्मा, विजय शंकर, रोहित शर्मा, मुरली विजय आणि उमेश यादव.
श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), करुणारत्ने, सदीरा समरविक्रम, मॅथ्यूज, लाहिरू थिरिमाने, डिकवेला, लाहिरू गमागे,
जेफ्रे वांडरर्से, सुरंगा लकमल, दासुन शनाका, धनंजय डिसिल्व्हा, विश्व फर्नांडो, दिलरूवान परेरा, लक्षण संदाकन आणि रोशन सिल्व्हा.
Web Title: Ninth Series to wait for victory, third test against Lanka today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.