ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाकेदार कामगिरी करुन लक्षवेधून घेणाऱ्या नितीशकुमार रेड्डीनं तिरुपती मंदिरात जाऊन देव दर्शन घेतले. २१ वर्षीय युवा क्रिकेटरनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिरुपती मंदीरात दर्शनासाठी गेल्याची गोष्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये तो गुडघे टेकत मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील प्रभावी कामगिरीनंतर आता युवा भारीतय क्रिकेटरचा देव दर्शनाचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशात परतल्यावर करण्यात आलं होतं जंगी स्वागत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर मायदेशात परतल्यावर विशाखापट्टणम येथे क्रिकेटरचं जंगी स्वागत करण्यात आले होते. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक ठरलेल्या युवा क्रिकेटच्या स्वागताचा थाट एकदम झक्कास असाच होता. विमानतळावरील स्वागतानंतर विशाखापट्टणम येथील गजुवाका या मूळ गावी त्याची ओपन जीपमधून मिरवणूकही काढण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियात दिमाखदार कामगिरी; पदार्पणाच्या मालिकेत त्याच्या भात्यातून आली डोळ्याच पारणं फेडणारी सेंच्युरी
ऑस्ट्रेलियातील मालिकेत पदार्पणाची संधी मिळाल्यावर अष्टपैलू खेळाडूनं मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दिमाखदार शतक झळकावले होते. पदार्पणाच्या या मालिकेत त्याने पाच सामन्यात ३७.२५ च्या सरासरीने २९८ धावा केल्या. भारताकडून या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमंकावर होता.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात एन्ट्री, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही होऊ शकते निवड
आयपीएलमध्ये हैदराबाद संघाच्या ताफ्यातून खेळताना आपल्या अष्टपैलूत्वाची झलक दाखवणाऱ्या या क्रिकेटरनं अल्पावधित छाप सोडत टीम इंडियातील आपलं स्थान पक्क केले आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही त्याची टीम इंडियात वर्णी लागली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या संभाव्य खेळाडूंच्या यादीतही त्याचे नाव चर्चेत आहे.