मुंबई : एबी डिव्हिलियर्सने खरचं हा वर्ल्ड खेळायला हवा होता. त्याचं इतकही वय झालं नव्हतं की तो दुखापतीनं ग्रासलाही नव्हता.. तो आजही Mr. 360 डिग्रीनं फटकेबाजी नक्की करु शकला असता... पण आफ्रिकेच्या आणि चाहत्यांच्या दुर्दैवानं त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मागच्या वर्षीच रामराम केलं. आज एबीची आठवण येण्याचं कारण एकच, ते म्हणजे आफ्रिका संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील सध्याची कामगिरी.
यजमान इंग्लंड संघाविरुद्ध सलामीलाच झालेला पराभव समजू शकतो. पण, बांगलदेशचं त्यांना नमवणं थोड पचायला अवघड गेलं. बांगलादेश हा कमकुवत संघ नक्कीच नाही. त्यांनी २००७ च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धचा विजय हा चमत्कार नव्हता, तो त्यांचा कर्तृत्वाचा होता. असो या विजयानं बांगलादेशचं मनोबल कमालीचं वाढवलं, पण आफ्रिकेचे खूप मोठे खच्चीकरण झाले.
आफ्रिकेने वर्ल्ड कप मध्ये सलग दोन सामने गमावण्याची ही दुसरी वेळ आणि भारताविरुद्धही कदाचित ते पराभवाची हॅटट्रिक पूर्ण करतील,सद्यस्थिती तरी तशीच दिसतेय. कुणी एक खेळाडू गेला म्हणून संघ थांबत नाही, परंतु त्या खेळाडूची पोकळी भरून काढण्यास वेळ लागतो. एबीने अखेरचा वन डे सामना गतवर्षी फेब्रूवारी महिन्यात खेळला. त्यानंतर आफ्रिकेचा संघ त्याची रिप्लेसमेंट शोधू शकलेला नाही. त्यामुळे संपूर्ण भार हा हाशिम अमला आणि कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या खांद्यावर आला.
आफ्रिकेत अनेक गुणवान खेळाडू आहेत, पण ते जबाबदारी घेण्यास कचरतात.. क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, जेपी ड्यूमिनी यांचे अपयश ही संघाची मोठी डोकेदुखी.रॅसी व्हॅन डेन ड्युसन अजून स्थिरावतोय.. त्यामुळे संघांत स्पार्क निर्माण करेल असा एकही खेळाडू नाही. म्हणूनच बांगलादेशकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून संघ बाहेर पडलेला नाही. जॅक कॅलिससारखा सक्षम अष्टपैलू खेळाडू अजूनही आफ्रिकेला सापडलेला नाही. फुहलक्वायो आणि ख्रिस मॉरीस हे पर्याय आहेत, पण तेही बेभरवशी.
त्यात भर ती डेल स्टेनची स्पर्धेतून माघार..
पहिल्या दोन सामन्यांत स्टेनची उणीव प्रकर्षाने जाणवली.. त्यामुळे तो भारताविरुद्ध खेळेल अशी अपेक्षा होती आणि आफ्रिकेची तीच एक आशा होती. पण घडले विपरितच. स्टेन तंदुरुस्त नसल्याने स्पर्धाच सोडून मायदेशी परतला. बांगलादेशकडून झालेल्या पराभवातून डोकं वर काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आफ्रिकेचा पाय आणखी खोलात गेला. लुंगी एनगिडीही तंदुरुस्त नाही, कागिसो रबाडा नवखा आहे. इम्रान ताहीर भार खेचून किती खेचेल? भारताविरुद्धही पराभव झाल्याने आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान डळमळीत झालेयण त्यापेक्षा त्यांचे होणारे मानसिक खच्चीकरण हे प्रदीर्घ काळ बोचणारे राहिल.