Vijay Hazare Trophy 2024-25: नोव्हेंबर महिन्यात आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामासाठी मेगालिलाव झाला. IPL Auction 2025 मध्ये परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंवर जास्त महागड्या बोली लागल्या. तसेच धक्कादायकरित्या काही खेळाडू विकले गेले नाहीत. भारतीय खेळाडूंपैकी काही खेळाडूंनी आतापर्यंत बरेच आयपीएल हंगाम गाजवले, पण तरीही या हंगामात त्यांना संघात घेण्यात आले नाही. खरेरीदार न मिळालेल्या काही खेळाडूंनी भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवयला सुरुवात केली आहे. समीर रिझवीने पहिल्याच सामन्यात सर्वात जलद द्विशतक ठोकले होते. त्यानंतर आता मयंक अग्रवालही (Mayank Agarwal) तुफान फॉर्मात असल्याचे दिसतेय. त्याने सलग तीन शतके ठोकत दमदार कामगिरी केली आहे.
हैदराबाद विरूद्ध साकारले दमदार शतक
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवाल चांगली फलंदाजी करत आहे. हा खेळाडू गेल्या ३ वर्षांपासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये या खेळाडूची बॅट तळपताना दिसतेय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटक क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मयंक खेळत आहे. मयंक अग्रवालने स्पर्धेतील क गटातील पाचव्या फेरीच्या सामन्यात विक्रमी खेळी खेळली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने १०४ चेंडूत १२४ धावा केल्या. त्यात त्याने १५ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटक संघाने ५० षटकांत ८ गडी गमावून ३२० धावा केल्या.
![]()
शतकांची हॅटट्रिक, मॅचविनर खेळींचा रतीब
विशेष म्हणजे मयंक अग्रवालने या स्पर्धेत सलग तिसरे शतक ठोकले. यापूर्वी त्याने अरुणाचल प्रदेश आणि पंजाबविरुद्ध शतकी खेळी खेळली होती. अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने ४५ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. त्याचवेळी पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने १२७ चेंडूत १३९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ४७ धावांची खेळी केली होती. म्हणजेच तो आपल्या संघासाठी मॅचविनर बनत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
मेगालिलावात खरेदीदार सापडला नाही...
यंदाच्या आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मयंक अग्रवाल विकला गेला नाही. गेल्या मोसमात तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. मात्र त्याला केवळ 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला बाहेर बसवले आणि नव्या हंगामाआधी करारमुक्त केले. यावेळी तो लिलावात १ कोटींची मूळ किंमत घेऊन उतरला होता. पण त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
Web Title: No bids in IPL auction Mayank Yadav smashes Hat trick of centuries in vijay hazare trophy kavya Maran SRH released
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.