मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा जाहीर सत्कार न करण्याचा निर्णय अखेर मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. नऊ वर्षांपासून सत्कारासाठी महानगरपालिका तेंडुलकरकडे वेळ मागत आहे, परंतु अखेरीस प्रतीक्षा पाहून सत्काराचा प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. तेंडुलकरला देशाचा सर्वोच्च भारतरत्न आणि राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
''कसोटी क्रिकेटमध्ये 50वे शतक झळकावण्याच्या निमित्ताने 2010 साली पालिकेने तेंडुलकरचा जाहीर सत्कार करण्याचे ठरविले होते. मात्र, त्यानंतर अनेकदा पाठपुरवठा करूनही त्याच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. 11 डिसेंबर 2011मध्ये तेंडुलकरसाठी पालिकेने एका सोहळ्याचेही आयोजन केले होते, परंतु त्यालाही तेंडुलकर उपस्थित राहिला नव्हता,''अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
पालिकेतर्फे कमला नेहरू पार्क येथे तेंडुलकरचा नागरी सत्कार करण्यात यावा, असा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी 2010 रोजी तेंडुलकरचा नागरी सत्कार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 26 फेब्रुवारी 2010 रोजी झालेल्या पालिका सभागृहाच्या बैठकीत नागरी सत्कार करण्यासाठी त्वरित तेंडुलकरशी संपर्क साधून संमती घेतली जाईल, असे निश्चित करण्यात आले होते. या कालावधीत तेंडुलकरने अनेक पुरस्कार स्वीकारले. अधिकाऱ्याने सांगितले की,''तेंडुलकरच्या सत्काराचा प्रस्ताव आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो पटलावर ठेवण्यात येईल.''
तेंडुलकरने तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांना पत्र पाठविले होते. मात्र त्यात सत्काराबाबतची तारीख आणि वेळ याविषयी कोणताच उल्लेख नव्हता. त्यामुळे अखेर महापौर कार्यालयाने 11 डिसेंबर 2011 रोजी नागरी सत्कार करण्यात यावा, असे कळविले होते. मात्र कामात व्यग्र असल्यामुळे तेंडुलकर उपस्थित राहू शकला नाही.