IPL 2022, Shardul Thakur : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी ( IPL 2022) १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन ( Mega Auction) होणार आहे. त्यासाठी १२१४ खेळाडूंनी नाव नोंदवलेली आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना कायम राखले. शार्दूल ठाकूर यंदाच्या लिलावाला सामोरे जाणार आहे आणि त्यामुळे कोणती फ्रँचायझी त्याला घेते, याची उत्सुकता त्यालाही लागलेली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात शार्दूल हा लखनौ फ्रँचायझीचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याच्याशी वाटाघाटी करताना दिसतोय. त्यात युझवेंद्र चहलनंही ( Yuzvendra Chahal) भन्नाट कमेंट केली आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल याला नेटकरी लॉर्ड शार्दूल म्हणून ओळखतात. संघाला गरज असताना शार्दूलनं अनेकदा उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वन डे सामन्यात भारताची मधली फळी अपयशी ठरलेली असताना शार्दूलनं फलंदाजीत चांगले योगदान दिले होते. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत शार्दूलचा अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार सुरू आहे.
शार्दूल, युजवेंद्र चहल आणि लोकेश राहुल यांच्यात आयपीएल मेगा ऑक्शन संदर्भात चर्चा करत आहेत. त्यात शार्दूल लोकेशला विचारतोय की लखनौ फ्रँचायझीच्या कर्णधारपदी कोणाची निवड होईल आणि त्यांचा ऑक्शनसाठी किती बजेट आहे. लोकेशच्या बाजूला चहल बसलेलला दिसतोय आणि लॉर्डसाठी बजेट नाही असे तो म्हणाला. भगवान के लिए बजेट नही होता ब्रो...
पाहा व्हिडीओ...
मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. या खेळाडूंमध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. २०१८नंतर हे पहिलेच मेगा ऑक्शन असणार आहे. आयपीएलच्या या पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी आल्यानं हे मेगा ऑक्शन होत आहे. दहा फ्रँचायझींनी आतापर्यंत ३३८ कोटी रुपये खर्च करून ३३ खेळाडूंना करारबद्ध केले आहे आणि आता २१७ खेळाडूंसाठी ५६०.५ कोटींचा वर्षाव लिलावात होताना दिसणार आहे. १२१४ पैकी फक्त २१७ खेळाडूंना आयपीएलची लॉटरी लागणार आहे आणि त्यात ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. या १२१४ खेळाडूंमध्ये २७० खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहेत, तर ९०३ खेळाडू अनकॅप आहेत. ४१ खेळाडू हे संलग्न संघटनेचे सदस्य आहेत.