जोहान्सबर्ग : पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत भारताविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली. यामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून १-१ अशी बरोबरी साधण्याच्या निर्धाराने भारतीय संघ गुरुवारी मैदानात उतरेल. यावेळी, भारतीय संघाला गोलंदाजीत विशेष सुधारणा करावी लागेल.
पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाज झुंजताना दिसले. पाऊस आणि दव यांमुळे परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक बनल्याने गोलंदाजांची कसोटी लागली.
डावखुरा अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी अनुक्रमे १५.५० आणि ११.३३ धावा प्रतिषटके यानुसार धावांची खैरात केली. परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी दोघे कल्पकतेने मारा करण्यात अपयशी ठरले. दीपक चहर वैयक्तिक कारणामुळे या दौऱ्यावर येऊ न शकल्याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत या दोन गोलंदाजांवरच भारतीय संघाची मदार आहे.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय गोलंदाजांमधील अनेक कमतरता दिसून आल्या. त्यामुळे आता मालिका वाचविण्यासाठी या दोघांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ केवळ चार सामने खेळणार असून, या स्पर्धेच्या निवडीसाठी निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी अर्शदीप-मुकेश यांना फारशा संधी मिळणार नाहीत.
टी-२० संघात पुनरागमन केलेल्या रवींद्र जडेजालाही फारशी चमक दाखवता आली नाही. त्याचवेळी, युवा रिंकू सिंगने प्रभावित फटकेबाजी करताना पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. गुरुवारीही तो हेच सातत्य कायम राखण्यावर भर देईल.
कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आणखी एक अर्धशतक झळकावत आपला फॉर्म दाखवून दिला. कर्णधार म्हणून ही मालिका बरोबरीत राखण्याच्या निर्धाराने तो पूर्ण प्रयत्न करील. फलंदाजांमध्ये यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मंगळवारी दोघेही भोपळा न फोडताच बाद झाले होते.
जोहान्सबर्ग ठरले आहे लकी!
मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्ग येथे होणार असून, हे ठिकाण भारतीय संघासाठी लकी ठरले आहे. येथे भारताने तीन टी-२० सामने जिंकले असून, एक सामना गमावला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात गेराल्ड कोएत्झी, मार्को यान्सेन आणि लुंगी एनगिडी हे तीन वेगवान गोलंदाज खेळणार नाहीत. भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हे तिघेही प्रथम श्रेणी सामना खेळणार आहेत.
Web Title: No choice but to win now, third T20 match; Indians will have to bow to South Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.