- प्रकाश गायकर
पिंपरी : “तो पहिल्यांदा उभा राहिला, तेव्हा त्यानं हातात बॅट घेतली. पुढं आमच्याही लक्षात आलं, मग आम्ही त्याला वाढदिवसाला कधीच कपडे घेतले नाहीत, तर बॅट दिली. क्रिकेटचं साहित्य देत त्याच्यावर खेळाबरोबरच संस्कार करत राहिलो...आणि आज तो चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) सारख्या आयपीएलमधील मोठ्या टीमचा कर्णधार झाला,” ‘सीएसके’चा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे आई-वडील सांगत होते. निमित्त होतं त्याच्या कर्णधारपदी निवडीचं.
ऋतुराज पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीचा. वडील दशरथ गायकवाड केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत, तर आई सविता गायकवाड वाकड येथील महापालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. दोघांना त्याच्या निवडीची बातमी सूनबाई उत्कर्षा गायकवाड यांनी फोनवरून दिली. ते ऐकताच दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
ते सांगत होते, ‘‘ऋतुराज लहानपणापासून खेळकर. घरात तो शांत असतो. कामावरच त्याचं जास्त लक्ष असतं. लहानपणी त्याचा क्रिकेटकडेच जास्त ओढा होता. ते लक्षात आल्यानंतर आम्ही त्याला क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली. घरात क्रिकेटची कोणतीच पार्श्वभूमी नाही, पण त्याच्या करिअरसाठी आम्ही क्रिकेटचा अभ्यास सुरू केला. क्रिकेटसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या वाढदिवसाला घेऊन देऊ लागलो. त्यानं स्वत:ला त्यामध्यं झोकून दिलं. अनेक दिग्गज खेळाडूंचा त्यानं अभ्यास केला. त्यांच्याकडून तो नानाविध गोष्टी शिकत गेला. त्यामुळंच आज ‘सीएसके’सारख्या मोठ्या टीमच्या कर्णधारपदी त्याची निवड झाली.’’
तो ‘डाय’ मारतो तेव्हा काळजी वाटते...
आई सविता गायकवाड सांगतात, ‘‘क्रिकेट खेळत असताना अनेकदा तो पडतो, डाय मारतो...घरी आल्यानंतर मात्र मी त्याला विचारते, तुला लागलं तर नाही ना? पण तो लपवतो. मला काही लागलं नाही, असं सांगतो. मात्र टीव्हीवर तो पडल्याचं दिसल्यावर काळजी वाटते हो..!’’
‘प्लेइंग एलेव्हन’च्या बाहेर ते कर्णधारपदापर्यंतचा प्रवास
ऋतुराजची २०१८ मध्ये ‘सीएसके’च्या टीममध्ये निवड झाली. मात्र तो ‘प्लेइंग एलेव्हन’मध्ये नव्हता. त्यानं बाहेर बसून त्या मॅच बघितल्या. त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यानं चांगली कामगिरी केली. २०१८ ला प्लेइंग एलेव्हनच्या बाहेर ते त्याच संघाचा कर्णधार, हा त्याचा प्रवास आनंददायी आहे.
- दशरथ गायकवाड