इंडियन प्रीमिअर लीगला ( आयपीएल ) सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली. वैयक्तिक कारणास्तव आपण ही माघार घेतल्याचे रैनानं सांगितले आहे, परंतु अजूनही CSK आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याच्या माघारीमागचं खरं कारण कळलेलं नाही. मायदेशात परतल्यानंतर रैनानं पुन्हा आयपीएलमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्याला परवानगी मिळणार की नाही, याबाबत बीसीसीआयनं त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यावरून रैनाचं पुनरागमन संकटात असल्याचे दिसत आहे.
Video : स्वत:ला कोरोनाची बाधा झाल्यानंतरही आफ्रिदीला गांभीर्यच नाही; सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा
रैनाला पुनरागमन करणे सोप नसेल. त्याला बीसीसीआयची परवानगी मिळवणे महत्त्वाचे असेल. रैनाच्या माघारीमागचं नेमकं कारण बीसीसीआयला अजूनही माहीत नाही आणि त्यानं कारण अजून समजावून सांगितलेलं नाही. त्यामुळे त्याच्या उत्तरानं बीसीसीआय असमाधानी राहिल्यास, त्याचा परतीचा मार्ग अवघडच आहे.
'रैनानं माघार का घेतली, हे बीसीसीआयला जाणून घ्यावं लागेल. त्याच्या माघार घेण्यामागे कुटुंब किंवा वैयक्तिक कारण आहे का, ते पहावं लागेल. महेंद्रसिंग धोनीसोबतचा वाद किंवा CSK मधील अंतर्गत वाद त्याच्या या निर्णयाचं कारण आहे का, तेही पहावं लागेल. नैराश्यामुळे त्यानं माघार घेतली असेल, तर ती त्याची मानसिक समस्या आहे. जर तो नैराश्यातच असेल, तर त्याला आम्ही परवानगी देणार नाही. तिथे काही चुकीचं घडलं तर त्याची जबाबदारी घेणार कोण?,''असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
आज जाहीर होणार आयपीएलचं वेळापत्रक
आयपीएलच्या 13व्या पर्वाचे वेळापत्रक आज जाहीर केले जाईल,’ अशी माहिती आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत रंगणारी ही लीग सुरू होण्यास आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत. दुबई, अबूधाबी आणि शारजा येथे सामन्यांचा थरार रंगणार आहे. सर्व संघ स्पर्धास्थळी दाखल झाले असून नियमावलीनुसार विलगीकरण कालावधी पूर्ण करीत सरावाला लागले आहेत.
चेन्नई सुपरकिंग्सने कोरोनाच्या तीन चाचण्यांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सराव सुरू केला. या संघातील दोन खेळाडूंसह १३ सदस्य पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली होती. त्या सर्वांना संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. दरम्यान सुरेश रैना आणि हरभजनसिंग या दोन अनुभवी खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे सीएसकेला पाठोपाठ धक्के बसले. या आधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेळापत्रक ४ सप्टेबर रोजी जाहीर होणार होते.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही वेळापत्रक तयार असून ते शुक्रवारी जाहीर होईल, असे म्हटले होते. मात्र ही प्रतीक्षा दोन दिवसानी वाढली. सध्याचा विजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात १९ सप्टेबर रोजी सलामीचा सामना खेळला जाईल, असे समजते
Web Title: No comeback for Suresh Raina? BCCI official hints he might not be allowed to play IPL 2020 now
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.