नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाचा पुन्हा एकदा अंतिम सामन्यात पराभव झाला आहे. भारताच्या हातातील सामना ऑस्ट्रेलियाने खेचून (India vs Australia) घेतल्याने भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. रविवारी झालेल्या सुवर्ण पदकाच्या सामन्यात भारतीय महिलांना कांगारूच्या संघाकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने सामन्यात शानदार पकड बनवली होती मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिला संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय पुरूष संघाचा माजी कर्णधार अझहरूद्दीन (Mohammad Azharuddin) चांगलाच संतापला आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून खेळाडूंची अक्कल काढून प्रश्न उपस्थित केले आहेत.
अझहरूद्दीने ट्विटद्वारे व्यक्त केला संताप
"भारतीय संघाची फलंदाजी म्हणजे अक्कल नसल्यासारखे आहे. कोणालाच कशाचेच ज्ञान नाही. जिंकलेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला." अझहरूद्दीनच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अझहरूद्दीनच्या नेतृत्वात भारतीय संघाने कितीवेळा ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला याची आठवण चाहते करून देत आहेत.
पराभवानंतर हरमनप्रीतने व्यक्त केली नाराजी
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतने अर्धशतकी खेळी करून एकतर्फी झुंज दिली मात्र तिला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. हरमनप्रीतने सामना संपल्यानंतर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आणि संघाने अशा चुकांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे तिने म्हटले. सुवर्ण पदकाला मुकल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले, "प्रत्येकवेळी मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये आम्ही पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आहोत, त्यामुळे आम्हाला त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आमच्याकडून लीग स्टेज किंवा छोट्या स्तरावरील स्पर्धेत अशा चुका होत नाहीत. मात्र मोठ्या व्यासपीठावरील फायनलमध्ये पराभव होणे हे कदाचित आमच्या डोक्यामध्ये घर करून बसले आहे."
भारताच्या हातून निसटले सुवर्ण
भारताला शेवटच्या १२ चेंडूंत विजयासाठी १७ धावा हव्या होत्या. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राधा यादव धावबाद झाली. दीप्ती शर्मा १३ धावांवर मेगन शूटच्या गोलंदाजीवर LBW झाली. तेव्हा भारताला ९ चेंडूंत १३ धावा हव्या होत्या. कनकशन खेळाडू म्हणून आलेल्या यास्तिका भाटीयाची निवड झाली होती. तानिया भाटीयाला विकेटकिपरींग करताना दुखापत झाली होती. शेवट्या ६ चेंडूंत भारताला सुवर्ण जिंकण्यासाठी ११ धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर यास्तिकासाठी मेघनाने स्वतःची विकेट टाकली. सामना ४ चेंडू १० धाव असा चुरशीचा झाला. यास्तिका पुढच्याच चेंडूवर LBW झाली अन् भारताचा पराभव निश्चित झाला. भारताचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला. त्यामुळे भारतीय महिलांच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Web Title: No common sense of indian women cricketers says Mohammad Azharuddin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.