मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगचा पूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) त्या आशयाचे पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी एप्रिल महिन्यानंतर ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार असल्याचे सांगितले आहे.
इंग्लंडच्या बेन स्टोक्सने मागील दोन हंगामात सर्वाधिक रक्कम घेतली, परंतु राष्ट्रीय कर्तव्यासाठी तो माघारी परतला. त्यामुळे 2017 साली रायजिंग पुणे सुपरजायंट्स आणि 2018 साली राजस्थान रॉयल्स यांना चांगला फटका बसला. पुढील वर्षीही इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एप्रिल महिन्यानंतर मायदेशी परतणार आहेत. 2019 ची विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेत इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या मंडळांनी खेळाडूंना 30 एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची मुभा दिली आहे.
2017 मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतले होते. ऑस्ट्रेलियाचे स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावरील एका वर्षांची बंदी मार्च अखेरीस संपणार आहे. त्यानंतर ते आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळेल. कदाचित त्यांचा राष्ट्रीय संघात समावेश झाल्यास ते आयपीएलमध्ये खेळणारही नाही.