इंडियन प्रीमिअर लीग २०२४ सुरू असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या आठवड्याच्या शेवटी बीसीसीआय निवड समितीला भेटण्याची शक्यता आहे. २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची भारतीय संघ निवडण्यासाठी दोन दिवस बैठक होणार आहे. १ मे ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यादृष्टीने आता हालचाली वेग घेत आहेत. डेडलाईन जवळ आलेली असताना भारताच्या काही माजी खेळाडूंनी T20 World Cup 2024 स्पर्धेसाठीचा संभाव्य संघ जाहीर केला आहे. आयपीएलची ६ जेतेपदं नावावर असलेल्या अंबाती रायुडू ( Ambati Rayudu ) यानेही त्याची संभाव्य १५ खेळाडूंची टीम आज जाहीर केली.
हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले
स्टार ऑल राऊंडर हार्दिक पांड्या हा सर्वांच्या चर्चेचा विषय आहे आणि त्याची आयपीएल २०२४ मधील कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. त्यामुळेच रायुडूने त्याच्या १५ खेळाडूंमधून त्याचे नाव कट केले आहे. हार्दिक प्रथमच मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतोय, परंतु कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याच्या कामगिरीने सर्वांना निराश केले आहे. बीसीसीआय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणताही प्रयोग करू इच्छित नसले तरी रायुडूने त्याच्या संघात मयांक यादव व रियान पराग यांची निवड केली आहे. मयांकने त्याच्या वेगवान माऱ्याने सर्वांना अचंबित केले आहे.
रायुडून इतरांप्रमाणे रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल व सूर्यकुमार यादव यांना संघात कायम ठेवले आहे, परंतु रिषभ पंत, लोकेश राहुल व संजू सॅमसन यांना डच्चू देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून दिनेश कार्तिकची निवड केली आहे. कार्तिकने आयपीएल २०२४ चे पर्व गाजवले आहे. रायुडूच्या संघात तीन फिरकीपटू व चार जलदगती गोलंदाज आहेत.