भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. पण, सोमवारी रोहित शर्मानं दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. विराट कोहलीनंही वन डे मालिकेत विश्रांती हवीय, अशी विनंती बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार कसोटी मालिकेनंतर विराटला विश्रांती हवीय. त्याला त्याच्या मुलीचा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा आहे. पण, या सर्व प्रकरणाराल विराट विरुद्ध रोहित असे वळण दिले जात आहे.
या प्रकरणावर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानं त्याचं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, विराट कोहलीनं वन डे मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे कळवले आहेत आणि रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळणार नाही. ब्रेक घेण्यास काहीच हरकत नाही, परंतु त्याचं टायमिंग योग्य असायला हवं. हे असं करणं संघातील वादाच्या चर्चांना खतपाणी घालण्यासारखं आहे. त्यानं क्रिकेटला कोणताच फायदा होत नाही.
विराटनं वन डे मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दोन्ही कर्णधार एकमेकांच्या नेतृत्वाखाली या दौऱ्यावर तरी खेळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. TOIनं तसं वृत्त दिले आहे. जानेवारी महिन्यात क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे विराटनं BCCIला कळवले आहे. जानेवारीत विराटची कन्या वामिका हिचा पहिला वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यानं वन डे मालिकेतून विश्रांतीचा निर्णय BCCIला कळवला आहे.
रोहितनं हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी बराच कालावधी मिळतोय आणि तो वन डे मालिकेसाठी संघात परतणार आहे. रविवारी सराव सत्रात रोहितला दुखापत झाली. त्याच्याजागी बीसीसीसीआयनं प्रियांक पांचाळ याचा कसोटी संघात समावेश केला आहे.