पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी नेहमी वादग्रस्त विधान करत असतो. काही दिवसांपूर्वी त्यानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आफ्रिदीनं पुन्हा आता काश्मीर मुद्दा छेडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे आफ्रिदी आपल्या घरीच होता. पण, आता कोरोनामुक्त झाल्यानंतर आफ्रिदीनं पुन्हा काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलं आहे.
शाहिद आफ्रिदीची पंतप्रधानांवर टीका; म्हणाला, मदत करण्याचे सोडून मंत्री सुट्टीवर गेलेत!
बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असताना एक घटना घडली. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असताना एका लहान मुलाला वाचविण्यासाठी सीआरपीएफचा जवान धावला आणि त्याला सुरक्षीत ठिकाणी नेले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्या मृत व्यक्तीचा तीन वर्षांचा नातू तिथेच होता. आजोबांना जमिनीवर निपचित पडलेले पाहून नातू त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आजोबा उठत नसल्याचे पाहून तो रडू लागला. दरम्यान दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता. त्यामुळे त्या लहान मुलाच्या जीवालाही धोका होता.
लहान मुलाचा जीव संकटात असल्याचे पाहून सीआरपीएफचा जवान त्याचा जीव वाचवण्यासाठी धावला. त्या मुलाला एका हातात घेतले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. या लहान मुलाला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून आफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानं लिहिलं की,''आजोबांचं शव आणि शस्त्रधारी जवान यांच्यात हा तीन वर्षांचा मुलगा सापडला. कोणताच फोटो काश्मीरी जनतेचं दुःख सांगू शकत नाही.'' त्यानं हे ट्विट पीन केलं आहे.