Join us  

ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 10:56 AM

Open in App

सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. 2020मध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारतीय पुरुष संघाला B गटात स्थान देण्यात आले आहे. 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंनतर भारत आणि पाकिस्तान हे आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच साखळी गटात एकमेकांसमोर येणार नाहीत. पाकिस्तानला A गटात स्थान देण्यात आले आहे. 2011नंतर आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाक पाचवेळा समोरासमोर आले आणि 2019च्या वर्ल्ड कपमध्येही ते एकमेकांना भिडणार आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये उभय संघ साखळीत समोरासमोर येण्याची शक्यता नाही.आयसीसी ट्वेंटी-20 क्रमवारीत पाकिस्तान आणि भारत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे या संघांना दोन वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे. भारत - पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींप्रमाणे इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हेही एकेमकांसमोर येण्याची शक्यता कमीच आहे. इंग्लंडला B गटात स्थान देण्यात आले आहे, तर ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान A गटात आहेत. क्रमवारीतील अव्वल आठ संघ मुख्य फेरीसाठी थेट पात्र ठरले आहेत, तर माजी विजेत्या श्रीलंका संघाला बांगलादेशसह पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या या स्पर्धेत 12 संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. जागतिक क्रमावारीत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर आहे आणि त्यांना सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थवर दुसरा सामना होईल. गतविजेत्या वेस्ट इंडिजला जेतेपद राखण्याच्या शर्यतीत सलामीलाच न्यूझीलंडचा सामना करावा लागेल.  गट A : पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पात्रता फेरीतील दोन संघगट B : भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पात्रता फेरीतील दोन संघ 

टॅग्स :आयसीसीआयसीसी विश्वचषक टी-२०आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२०बीसीसीआयभारतपाकिस्तान