भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामन्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हे उभय संघ भिडले आणि यावेळी बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्ताननं टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात प्रथमच पाकिस्ताननं टीम इंडियावर विजय मिळवला. त्यामुळे या पराभवाचा वचपा केव्हा काढायला मिळतोय, याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना आहे. आता पुढील वर्ष आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan सामना होऊ शकतो. पण, यंदा झालेल्या सामन्यानं व्ह्यूअर्सचे सर्व रेकॉर्ड मोडले आणि आता दोन्ही देशांमध्ये द्विदेशीय मालिका व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधील सामन्यात बाबर आजम अँड कंपनीनं १० विकेट्स राखून विजय मिळवला. १२ सामन्यांनंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं टीम इंडियावर हा विजय मिळवला. हा सामना १६७ मिलियन म्हणजेत १६.७ कोटी लोकांनी टिव्ही, अॅपवर पाहिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक व्ह्यूअर्स मिळालेला हा सामना ठरला. एवढी मोठी व्ह्यूअर्सशिप असूनही २०१२-१३ नंतर उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका झालेली नाही.
भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका कधी होईल?; या प्रश्नाचं उत्तर अनेकांना ऐकायचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) या प्रश्नावर शनिवारी महत्त्वाचे अपडेट्स दिले, परंतु त्यानं आशा उंचावण्याचं कारण नाही. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर अलार्डिस (Geoff Allardice) यांनी ही माहिती दिली. दुबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे स्वरुप, अफगाणिस्तान क्रिकेट आणि भारत-पाकिस्तान मालिकेवरील प्रश्नांवर त्यांचे मत मांडले.
अलार्डिस यांनी हे स्पष्ट केले की India vs Pakistan यांच्यातल्या द्विदेशीय मालिकेसाठी आयसीसी भविष्यात कोणतीच भूमिका निभावणार नाही. ते म्हणाले,''द्विदेशीय मालिका आमचं काम नाही. भारत-पाकिस्तान सामना पाहायला आम्हालाही आवडतं, परंतु द्विदेशीय मालिका खेळवायची की नाही हा उभय संघांच्या बोर्डाचा प्रश्न आहे. आयसीसी यात कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करणार नाही. ''अन्य द्विदेशीय मालिकांप्रमाणे जर दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड सहमत असतील, तर मालिका होते. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्या मालिकेचा प्रश्न दोन्ही देशांच्या बोर्डानं सोडवायचा आहे. सद्यस्थिती पाहता उभय देशांमध्ये द्विदेशीय मालिकेवरून फार काही बदललं आहे असे मला वाटत नाही.''