IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या स्थगित झालेल्या सीझनला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून यूएईमध्ये स्पर्धेचे उर्वरित ३१ सामने खेळवले जाणार आहेत. पण टी-२० चा 'युनिव्हर्सल बॉस' अशी ओळख असलेल्या वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज ख्रिस गेलच्या एका ट्विटनं सर्वांना गोंधळात टाकलं आहे.
पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघानं नुकतंच ऐनवेळी दौऱ्यातून माघार घेतली. सुरक्षेचं कारण न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानला धक्का दिला आणि एकही सामना न खेळता संघ मायदेशी परतला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतर पाकिस्तानकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच ख्रिस गेल यानं पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या भावनांचा आदर करणार आणि किवींच्या निर्णयाला विरोध करणारं एक ट्विट केलं आहे. ख्रिस गेलनं पाकिस्तानला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
"मी उद्या पाकिस्तानला जायोत. माझ्यासोबत कोण कोण येतंय?", असं ट्विट ख्रिस गेल यानं केलं आहे. सुरक्षेचं कारण देत पाकिस्तानातून माघार घेणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला गेलनं अप्रत्यक्षरित्या टोमणा लगावला आहे. गेलच्या भूमिकेचं पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून स्वागत केलं जात आहे. अर्थात खरंच गेल पाकिस्तानला जातोय का याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पण त्याच्या या ट्विटनंतर एका नेटिझननं ख्रिस गेल मग आयपीएलमध्ये दिसणार नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
ख्रिस गेल आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळत आहे. दरम्यान, गेलनं दाखवलेल्या पाठिंब्याबाबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर यानंही आभार व्यक्त केले आहेत. गेलच्या ट्विटवर रिप्लाय देताना आमीर यांनं गेलचा मात्तबर खेळाडू असा उल्लेख करत त्याला निमंत्रित केलं आहे. गेलच्या या ट्विटची नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा होत असून त्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.