लाहोर : पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे स्पर्धेनंतर संघात मुख्य प्रशिक्षकांसह अनेक बदल पाहायला मिळाले. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या तंदुरूस्तीवरही प्रचंड चर्चा रंगल्या. त्यामुळेच नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि निवड समिती प्रमुख मिसबाह उल हक यांनी सर्व प्रथम याच मुद्दावर हात घातला. त्यांनी खेळाडूंच्या डाएट आणि न्युट्रीशन प्लानमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना खेळाडूंसाठी कठोर पाऊल उचललं आहे.
तंदुरुस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मिसबाहने ठणकावून सांगितले. पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं खेळाडूंच्या जेवणातून तेलकट आणि तिखट पदार्थांवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे खेळाडूंना आता त्यांची आवडती बिर्याणीही आणि गोड पदार्थही खाता येणार नाही. ''खेळाडूंना आता बिर्याणी किंवा तेलकट-तिखट पदार्थ मिळणार नाही. शिवाय त्यांना गोड पदार्थही खाता येणार नाही,'' असे खेळाडूंना जेवण पुरवणाऱ्या कॅटेरिंग कंपनीच्या एका सदस्यानं सांगितले.
मिसबाहनं केवळ राष्ट्रीय खेळाडूंसाठीच नव्हे, तर स्थानिक क्रिकेटमधील खेळाडूंसाठीही ही सक्ती केली आहे. खेळाडूंची तंदुरुस्ती हे मिसबाहसाठी पहिले प्राधान्य आहे. ''राष्ट्रीय संघाकडून खेळत नसताना पाकिस्तानी खेळाडू तेलकट व तिखट खाद्यांवर ताव मारतात, परंतु मिसबाहनं प्रत्येक खेळाडूंना तंदुरुस्तीवर लक्ष ठेवण्याची ताकिद दिली आहे,''असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मिसबाहने सोमवारी जाहीर केलेल्या संभाव्य संघातून वरीष्ठ खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. मिसबाहने पहिल्याच निवड समितीच्या बैठकीमध्ये संघातूल शोएब मलिक आणि मोहम्मद हफीझ यांचा पत्ता कट केल्याचे पाहायला मिळते आहे. पण, हे दोन्ही खेळाडू सध्या कॅरेबियन प्रीमिअऱ लीगमध्ये असल्यानं त्यांचा संभाव्य संघात समावेश करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानचा संघ : सर्फराज अहमद, बाबर आझम, आबिद अली, अहमद शहजाद, इफ्तिखार अहमद, इमाम वसीम, इमाम-उल-हक, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, आसिफ अली, फहीम अशरफ, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, शादाब खान, उमर अकमल, उस्मान शिनवारी आणि वहाब रियाज.