नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर खराब कामगिरी होत असेल तर तुम्ही कसे आहात, अशी विचारणादेखील होत नाही. माझ्या वाईट काळातही कुटुंबीयांव्यतिरिक्त विचारपूस करणारी आणि दिलासा देणारी महेंद्रसिंग धोनी हीच एकमेव व्यक्ती होती, असा खुलासा विराट कोहलीने शनिवारी केला.
आरसीबीच्या पोडकास्टवर माजी कर्णधार विराट म्हणाला, ‘खराब काळात तुम्ही कसे आहात, हे विचारायलादेखील लोक विसरतात. अशावेळी महेंद्रसिंग धोनीने मला टेक्स्ट मेसेज पाठवला. माही भाई मला मेसेज करून विचारपूस करणारी एकमेव व्यक्ती होती. या मेसेजमुळे मला खूप काही समजण्यास मदत झाली. धोनीच्या या गोष्टी त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळा असल्याचे सिद्ध करतात. ’
विराटने मागच्या चार वन डेत तीन शतकी खेळी करीत जुनी लय मिळविली. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये आशिया चषक टी-२० त शतक ठोकून शतकांचा दुष्काळ संपविला होता.
विराट पुढे म्हणाला, ‘अनुष्का माझी सर्वांत मोठी ताकद आहे. मला जवळून पाहताना तिने माझी व्यथा समजून घेतली. याच काळात बालपणीचे कोच आणि कुटुंबीयांशिवाय मला दिलासा देणारी धोनी एकमेव व्यक्ती होती.’
धोनीशी संपर्क होणे कठीणच...कोहलीने खुलासा केला की धोनीशी संपर्क करणे खूप कठीण आहे. तुम्ही क्वचितच माहीपर्यंत पोहोचू शकता. कारण तो फोनकडे कधीही पाहत नाही. मी कोणत्याही दिवशी त्याला कॉल केला, तर ९९ टक्के तो उचलणार नाही. माझ्या वाईट काळात त्याने मला दोनदा कॉल करणे हे मी माझे भाग्य समजतो. जानेवारी २०२२ ला मी कसोटी संघाचे नेतृत्व सोडले त्यावेळीदेखील केवळ धोनीने मला मेसेज पाठविला होता.