इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये ( IPL 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या सामन्यात विराट कोहली व नवीन उल हक यांच्यात झालेल्या वादाने मैदान गाजवले. त्यात गौतम गंभीरने उडी घेतल्याने वातावरण अधिक तापले होते. या भांडणाला ७ महिने उलटले आणि आज त्यावर लखनौ सुपर जायंट्सचा माजी मार्गदर्शक गंभीरने मौन सोडले. माझ्या खेळाडूंच्या अंगावर याल तर त्याला जशासतसे उत्तर दिले जाईल, असे गंभीर म्हणाला.
“एक मार्गदर्शक म्हणून, कोणीही माझ्या खेळाडूंसोबत भांडयला येऊ शकत नाही आणि याबाबत माझी थोडी वेगळी भूमिका आहे. जोपर्यंत खेळ चालू होता, तोपर्यंत मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता, पण खेळ संपला की, माझ्या खेळाडूंशी कोणी जोरदार वाद घालत असेल, तर मला त्याचा बचाव करण्याचे सर्व अधिकार मला आहेत,” असे गंभीरने एएनआय पॉडकास्टवर सांगितले.
या वादानंतर गंभीर आणि कोहली या दोघांना त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागला होता. त्यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ अंतर्गत लेव्हल दोन गुन्ह्याची कबुली दिली आहे, जो सार्वजनिक वर्तनाच्या अनियंत्रित कृतींशी संबंधित आहे. या वादानंतर भारतीय चाहत्यांनी नवीनला टार्गेट करण्यास सुरुवात केले. मैदानावर तो दिसताच चाहते कोहली-कोहली अशा घोषणा देत होते. पण, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कोहलीने हा वाद मिटवला. त्याने चाहत्यांना असे ट्रोल करण्यास मनाई केली.
आयपीएल २०२४ मध्ये गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शन करताना दिसेल. गंभीर २०११ ते २०१७ या काळात KKR कडून खेळला. या काळात केकेआर संघाने दोनदा विजेतेपद पटकावले. KKR पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरले आणि २०१४ मध्ये चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० च्या अंतिम फेरीतही पोहोचले. लखनौ सुपर जायंट्सचे मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरनेही एक भावनिक पोस्ट केली होती,"मला लखनौचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघाशी संबंधित सर्वांचा पाठिंबा मिळाला. मी डॉ. संजीव गोयंका (लखनौ संघाचे मालक) यांचे आभार मानू इच्छितो. डॉ. गोएंका यांचे नेतृत्व उत्कृष्ट होते, मला आशा आहे की लखनौ संघ भविष्यातही चांगली कामगिरी करेल.