इंदूर : दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये ४० वर्षांचा होणा-या वसीम जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बरेच काही मिळवले असले तरी, फलंदाजी क्रीझमध्ये मात्र त्याला जगातील सर्वांत सहज व शांत वाटते.
संघातील तीन अनुभवी व्यावसायिक खेळाडूंपैकी एक असलेल्या जाफरने विदर्भाला पहिले रणजी जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जाफरचे हे नववे रणजी विजेतेपद आहे.
मुंबईचे प्रतिनिधित्व करताना जाफरला मिळालेल्या मोठ्या अनुभवाचा विदर्भाला लाभ झाला. त्याने जवळजवळ ६०० धावा फटकावण्याव्यतिरिक्त युवा खेळाडूंसाठी मेन्टरची भूमिका बजावली.
आता माझ्यात अधिक क्रिकेट शिल्लक नसल्याचे कबूल करताना भारताच्या या माजी सलामीवीर फलंदाजाने फिट असेल तोपर्यंत खेळणार असल्याचे सांगितले.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळजवळ १८,००० धावा फटकावणारा जाफर म्हणाला, ‘कदाचित मी आणखी एक रणजी फायनल खेळणार, याचा कुणी विचारही केला नसेल; पण नववे रणजी जेतेपद पटकावले आहे.’
विदर्भाच्या जेतेपदाच्या मोहिमेत मात्र जाफरला अन्य खेळाडूंचा विसर पडलेला नाही. अनुभवी जाफर म्हणाला, ‘विदर्भात प्रतिभा आहे. पण माझ्या मते, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी करड्या शिस्तीत खेळाडूंना जोखीम पत्करणे शिकविले. त्याची गरजही होती. या खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे; पण कधी कधी त्यांच्याकडून अतिरिक्त प्रयत्न करवून घेणे आवश्यक असते. कारण त्यांना स्वत:च्या क्षमतेची कल्पना नसते. त्यामुळे माजी गोलंदाजी प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी व प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या उपस्थितीमध्ये ते काय करू शकतात, याची तुम्हाला कल्पना आली असेलच.
जाफरने १९९६-९७ मध्ये पदार्पण केले होते आणि जवळजवळ दोन दशकांपासून त्याच्यातील धावांची भूक शमलेली नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतकांच्या मदतीने जवळजवळ २००० धावा फटकावल्या. त्यात २००६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या द्विशतकी खेळीचा समावेश आहे.
आपल्या दुसºयाच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतकी खेळी करणारा जाफर रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा फटकावण्याबाबत मुंबई संघाचा त्याचा माजी सहकारी अमोल मुजुमदारपेक्षा १५०० धावांनी पुढे आहे. रणजी ट्रॉफीमध्ये जाफरच्या नावावर १०,७३८ धावांची नोंद आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी केवळ खेळण्याबाबत विचार करतो. मला क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त दुसरे काहीच येत नाही. प्रशिक्षण व समालोचकाची भूमिका बजावू शकतो; पण मला त्यात अधिक आनंद मिळत नाही. माझ्यात आता बरेच क्रिकेट शिल्लक नाही, पण सध्या खेळण्याचा आनंद घेत आहे. शक्य होईल तोपर्यंत खेळण्यास इच्छुक आहे. सर्व काही फिटनेसवर अवलंबून आहे. - वसीम जाफर
Web Title: No one could have thought about it - Wasim Jafar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.