नवी दिल्ली : जगभरातील क्रिकेटमध्ये लीग क्रिकेटचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे त्याचा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसू शकतो अशी भीती अनेक दिग्गजांनी व्यक्त केली होती. खेळाडूंचा देखील लीग क्रिकेटकडे कल वाढत चालला आहे, यावरून खेळाडूंवर देखील निशाणा साधला जात आहे. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसनने (James Anderson) देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. "माझ्या नंतर मला नाही वाटत आणखी कोणता खेळाडू वयाच्या ४० वर्षांपर्यंत कसोटी क्रिकेट खेळेल", अशा शब्दांत ॲंडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल चिंता बोलून दाखवली.
ॲंडरसनने व्यक्त केली चिंतासर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या यादीत ॲंडरसनचा दुसरा नंबर लागतो. बुधवारी तो आपल्या कसोटी कारकिर्दीतील १७३ वा सामना खेळणार आहे. त्याच्यापुढे २०० सामने खेळणाऱ्या भारताच्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) नंबर लागतो. ॲंडरसनच्या म्हणण्यानुसार त्याचा सहकारी खेळाडू स्टुअर्ट ब्रॉर्ड वयाच्या चाळीशीपर्यंत क्रिकेट खेळू शकत नाही. ३६ वर्षीय ब्रॉड इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रमुख चेहरा आहे. आजकाल फ्रँचायझी लीगवर सर्वकाही अवलंबून असून आज मी ज्या स्तरावर आहे हे माझे भाग्य असल्याचे ॲंडरसनने म्हटले.
वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत कसोटी क्रिकेट न खेळण्याच्या कल्पनेवर तो म्हणाला, "यानंतर नक्कीच असे होऊ शकत नाही कारण कोणीही इतका मूर्ख असणार नाही", क्रिकइन्फोशी बोलताना ॲंडरसनने आपले मत व्यक्त केले. तसेच द हंड्रेड एक लहान फॉरमॅट आहे. मोठ्या कालावधीपासून मी पाहतो आहे की कोणताच खेळाडू कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी इच्छुक नाही, असे ॲंडरसनने अधिक म्हटले.