लंडन: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी स्वत:च्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल कुठलाही खेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. हाच सोहळा भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव होण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा होती. यामुळे इंग्लंडविरुद्ध मॅन्चेस्टर येथील पाचवी कसोटी देखील रद्द करावी लागली होती.
शास्त्री, क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर, गोलंदाजी कोच भरत अरुण आणि फिजिओ नितीन पटेल हे ओव्हल कसोटीदरम्यान कोरोनाबाधित झाले. मॅन्चेस्टर येथे पाचव्या कसोटीआधी सहायक फिजिओ योगेश परमार हे देखील पॉझिटिव्ह आले. यामुळे कसोटी वादग्रस्तरीत्या रद्द करण्यात आली. भारत या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.
वृत्तानुसार प्रकाशन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व लोकांनी मास्क घातला नव्हता. या पार्श्वभूमीवर ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, ‘त्या समारंभात मी ज्या लोकांना भेटलो ते सर्वजण शानदार होते. मला याबद्दल कुठलाही खेद नाही. माझे खेळाडू सतत खोलीत रहायचे. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना खोलीबाहेर येता आले. विविध स्तरातील लोकांच्या भेटीगाठी घेणे त्यांच्यासाठी आनंददायी अनुभव होता.’
‘ओव्हल कसोटीदरम्यान ज्या जिन्याचा उपयोग ५ हजार लोक करायचे त्याच जिन्यातून आम्ही देखील गेलो. मग पुस्तक प्रकाशन सोहळ्यावर आक्षेप का घेता? मी मुळीच चिंतेत नाही. प्रकाशन सोहळ्यात २५० लोकांची उपस्थिती होती आणि त्या पार्टीेमुळे कोणीही कोरोनाबाधित झालेले नाही,’ असे शास्त्री यांनी ठणकावून सांगितले. दहा दिवसाच्या क्वारंटाईन काळाबाबत ते म्हणाले,‘ दहा दिवसात गळ्यात खरखर याशिवाय मला कुठलेही अन्य लक्षण नव्हते. ताप देखील आला नाही. ऑक्सिजनचा स्तर ९९ टक्के असा होता. या काळात मी एकही औषध घेतले नाही.’
ज्याची अपेक्षा होती, ते सर्व काही मिळाले
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. म्हणजे पुढील दोन महिन्यानंतर रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार नाहीत. दरम्यान, रवी शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळाबाबत एक विधान करताना ,‘प्रशिक्षकाच्या कार्यकाळात ज्याची अपेक्षा बाळगून होतो, ते सर्व काही मिळवले,’ असे सांगितले.
भारतीय संघ टी-२० विश्वचषक जिंकल्यास माझ्या कार्यकाळात ‘सोने पे सुहागा’ ठरेल, असे शास्त्री यांनी द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘माझ्या कार्यकाळात कसोटीत नंबर वन बनलो, ऑस्ट्रेलियामध्ये दोनवेळा मालिका जिंकली, इंग्लंडमध्ये जिंकलो. या उन्हाळ्याच्या सुरुवातीस मायकेल एथरटनशी बोललो होतो आणि म्हणालो होतो की, माझ्यासाठी हे अखेरचे सत्र आहे. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरविणे आणि कोविड काळात इंग्लंडमध्ये विजय मिळवणे तेदेखील लॉर्ड्स आणि ओव्हलवर, हे खास होते.’ . संघासोबत काम करताना कानावर नेहमी बंदूक ताणली असल्याचादेखील भास व्हायचा.’ रवी शास्त्रीं हे २०१७ ला मुख्य कोच बनले, त्यानंतर २०१९ ला पुन्हा फेरनियुक्ती झाली होती.
कसोटी रद्द झाल्यामुळे सोहळ्याला टार्गेट केले!
‘मी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पॉझिटिव्ह झालो नाही. हा सोहळा ३१ ऑगस्ट रोजी होता, आणि मी ३ सप्टेंबरला पॉझिटिव्ह झालो. तीन दिवसात असे घडू शकत नाही. माझ्यामते मी लीड्सवर बाधित झालो.इंग्लंडमध्ये १९ जुलै रोजी सर्व काही खुले करण्यात आले होते. लोकांचे हॉटेलमध्ये येणे, लिफ्टचा वापर सुरू झाले होते. मी लंडनमध्ये क्वारंटाईन असल्याने मॅन्चेस्टर कसोटीबाबत निर्णय घेण्यात सहभागी नव्हतो. यासंदर्भात खेळाडूंशी देखील चर्चा केली नव्हती. हा निर्णय कुणी घेतला याची मला माहिती नाही.ज्युनियर फिजिओ कसा पॉझिटिव्ह आला हे देखील माहिती नाही. तो सहा खेळाडूंची काळजी घेत होता. येथूनच वाद सुरू झाला.’ - रवी शास्त्री
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ...
कसोटी वन डे टी-२०
सामने ४३ ७२ ६०
विजय २५ ५१ ४०
२०१९ - वन डे विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत
१९ - द्विपक्षीय टी-२० मालिकेत १५ वेळा विजय
१३ - कसोटी मालिकांपैकी १० मालिका जिंकल्या
१६ - व्दिपक्षीय वन डे मालिकांपैकी १२ मालिकांमध्ये विजय
Web Title: ‘No one has corona because of that party’; No regrets about the book release ceremony says Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.