ललित झांबरे : रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या विशाखापट्टणम कसोटीत दोन्ही डावात षटके झळकावून आणि कितीतरी षटकार लगावून बरेच विक्रम केले. त्याची चर्चासुध्दा आहे. कसोटीत प्रथमच सलामीला खेळताना दोन्ही डावात शतके झळकावणारा तो पहिलाच भारतीय आहे मात्र या दोन्ही खेळींवेळी त्याची एक अशी नोंद झालीय की तो त्यासंदर्भात भारतातीलच नाही तर जगातील एकमेव फलंदाज आहे.
ही वैशिष्ट्यपूर्ण नोंद म्हणजे दोन्ही डावात शतके झळकावताना दोन्ही वेळा यष्टीचित (स्टम्पिंग) झालेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्यातही आणखी विशेष बाब म्हणजे दोन्ही डावात सारख्याच यष्टीरक्षक- गोलंदाजांच्या जोडीकडून (डी कॉक/ महाराज) तो बाद झालाय.
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 21 फलंदाज दोन्ही डावात यष्टीचीत झाले आहेत पण त्यातील दोन्ही डावातील शतकवीर रोहित शर्मा हा एकटाच. इंग्लंडचे वॉल्टर आणि विन्स्टन प्लेस हेसुध्दा शतक केल्यावर यष्टीचित झाले पण त्यांचे शतक एकाच डावात होते.
दोन्ही डावात भोपळ्यावर यष्टीचीत झालेले दोघेच
आता याच्या अगदी उलट दोन फलंदाज असे आहेत की जे कसोटीच्या दोन्ही डावात एकही धाव न करता यष्टीचित झाले आहेत. ते फलंदाज म्हणजे इंग्लंडचे बॉबी पील आणि झिम्बाब्वेचा ख्रिस एम्पोफू. 1895 च्या अॉस्ट्रेलियाविरुध्दच्या सिडनी कसोटीत यष्टीरक्षक जार्विस व गोलंदाज चार्ली टर्नर या दुकलीने बॉबी पिल याला दोन्ही डावात धावांचे खाते खोलण्याआधीच यष्टीचित केले होते.
त्यानंतर 2005 च्या न्यूझीलंडविरुध्दच्या हरारे कसोटीत ख्रिस एम्पोफू दोन्ही डावात असाच भोपळा न फोडता यष्टिचीत झाला. यष्टीरक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम व डॅनिएल व्हेट्टोरी या कॉम्बिनेशनने त्याला बाद केले.