Join us  

...तर रिषभ पंतला संपूर्ण देश विसरुन जाईल; वीरेंद्र सेहवागचं खळबळजनक विधान!

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याबाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं केलेल्या खळबळजनक विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 4:48 PM

Open in App

नवी दिल्ली-

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याबाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं केलेल्या खळबळजनक विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. रिषभ पंत जर भारताच्या 'त्या' ११ खेळाडूंच्या यादीत आपली जागा निश्चित करू शकला नाही तर देशातील लोकांच्या तो जास्तकाळ लक्षात राहणार नाही, असं विधान वीरेंद्र सेहवागनं केलं आहे. एका स्पोर्ट्स चॅनलच्या 'होम ऑफ हिरोज' नावाच्या कार्यक्रमात सेहवागनं हे विधान केलं आहे. लोकांनी आपलं नाव विसरुन जाऊ नये असं जर रिषभ पंतला वाटत असेल तर त्यानं आता व्हाइल बॉल क्रिकेटमधून बाहेर येऊन जरा रेड बॉल क्रिकेटकडे म्हणजेच कसोटी क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत करायला हवं. जर तो कसोटी क्रिकेट जास्त खेळला नाही, तर त्याला लोक विसरून जातील, असं सेहवाग म्हणाला. 

रिषभ पंत तर कसोटी आणि वनडे अशा दोन्ही क्रिकेटमध्ये सध्या खेळत आहे. मग सेहवाग असं का म्हणतोय असा तुम्ही विचार करत असाल तर त्याचं म्हणणं रिषभ पंतनं १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले पाहिजेत असं आहे. 

१०० हून अधिक कसोटी सामने खेळले पाहिजेत"रिषभ पंत १०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळला तरच त्याचं नाव भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवलं जाईल. आतापर्यंत केवळ ११ क्रिकेटपटू असे आहेत की ज्यांनी १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत आणि कोणताही क्रिकेट चाहता त्या ११ खेळाडूंची नावं आजही तुम्हाला सांगू शकेल", असं सेहवाग म्हणाला. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंपैकी जवळपास सर्वच युवा क्रिकेटपटूंना नक्कीच असं वाटत असेल की त्यांनी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये खेळावं, असंही तो म्हणाला. 

कोहलीचं दिलं उदाहरणवीरेंद्र सेहवागनं यावेळी विराट कोहलीचाही उल्लेख केला. आपण १००-१५० किंवा २०० कसोटी सामने खेळलो तरच आपलं नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं जाईल याची जाणीव विराट कोहलीला देखील आहे. त्यामुळेच त्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याकडे जास्त भर असतो, असं सेहवाग म्हणाला. भारतीय क्रिकेटमध्ये एक दशकाहून अधिक काळ क्रिकेट खेळलेल्या सेहवागनं आपल्या करिअरमध्ये ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये ३५.०५ सरासरीनं ८२७३ धावा केल्या आहेत. "माझ्या मतानुसार कसोटी क्रिकेट सर्वोत्तम क्रिकेट आहे. मला आजवर अनेकांनी सांगितलं की पहिला चेंडू सांभाळून खेळावा त्यात अगदी सचिन तेंडुलकर यांचाही समावेश होता. पण मी कधीच असं केलं नाही. पहिला चेंडू मी वॉर्मअप चेंडूसारखा खेळायचो", असंही सेहवाग म्हणाला.

टॅग्स :विरेंद्र सेहवागरिषभ पंत
Open in App