नवी दिल्ली : शाहीद आफ्रिदीने संपूर्ण कारकिर्दीत आपल्याविरुद्ध पक्षपात केला. त्याच्यामुळेच देशाकडून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याची संधी हुकल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया याने केला.
कनेरिया हा त्याचा मामा अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तान संघाकडून खेळणारा केवळ दुसरा हिंदू खेळाडू आहे. दलपत यांनी ६१ कसोटी सामन्यात २६१ गडी बाद केले होते. कनेरिया हा मात्र २००० ते २०१० या कालावधीत केवळ १८ एकदिवसीय सामने खेळू शकला. आफ्रिदीकडून मिळालेल्या या वागणुकीसाठी माझा धर्म आड आल्याचे मत कनेरियाने कराची येथून वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले.
तुझ्यावर धार्मिक अन्याय झाला असे वाटते का, असे विचारताच ३९ वर्षांचा दानिश म्हणाला, ‘पाकच्या वन डे संघाचा भाग असताना दोघेही स्थानिक क्रिकेट एकाच संघाकडून खेळत होतो. आफ्रिदी नेहमी माझ्याविरुद्ध असायचा.’ कुणी व्यक्ती नेहमी तुमच्या विरोधात असेल तर याला धार्मिक भेदभाव नाही तर आणखी काय म्हणायचे, असा उलट सवाल त्याने केला. आफ्रिदी नसता तर मी १८ पेक्षा अधिक सामने खेळलो असतो, असेही तो म्हणाला.
‘आफ्रिदीने मला पक्षपाती वागणूक दिली. त्याच्यामुळे अधिक सामने खेळू शकलो नाही. स्थानिक क्रिकेटमध्येही तो माझा कर्णधार होता. मला नेहमी संघाबाहेर ठवायचा. संघात नाव असायचे मात्र अंतिम ११ जणांतून बाहेर ठेवले जात होते. आफ्रिकी इतरांना प्रोत्साहन द्यायचा. तरीही पाककडून १८ सामने खेळायला मिळाले, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो,’असे कनेरियाने म्हटले आहे.
‘मी लेगस्पिनर होतो. आफ्रिदीदेखील लेगस्पिन मारा करायचा. या कारणापोटीदेखील तो मला संधी नाकारायचा. संघात एकाचवेळी दोन फिरकी गोलंदाजांची गरज काय, या सबबीखाली तो माझा काटा काढत होता. आफ्रिदी आंतरराष्टÑीय क्रिकेटपासून अलिप्त राहायचा त्यावेळी स्थानिक क्रिकेटमधून मला तो वगळत होता,’असा आरोपही कनेरियाने आफ्रिदीविरुद्ध केला.
कनेरियाला इंग्लंडमध्ये २००९ च्या कौंटी हंगामात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले. तेव्हापासून तो पीसीबीकडे मदतीसाठी आग्रह करीत आहे. त्याला पुन्हा क्रिकेटकडे वळायचे आहे. तो म्हणाला,‘ मी धर्माचा मुद्दा उपस्थित करू इच्छित नाही. मी केवळ पीसीबीकडून मदत मागत आहे. मोहम्मद आमीर, सलमान बट्ट, यांना पुनरागमनाची संधी मिळत असेल तर मला का नाही? हा माझा प्रश्न आहे. मी एक चूक केली, मात्र चूक तर इतर खेळाडूंनीदेखील केली होती. मला टॉयलेट पेपरसारखे वापरून फेकू नका. मी दीर्घकाळ पाक संघाची सेवा केली. त्यामुळे आता बोर्डाने मला पाठिंबा द्यायला हवा, अशी मागणी कनेरियाने केली आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: no opportunity in ODIs by Afridi : Danish Kaneria
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.