भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली, तर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघानं २-१ ने बाजी मारली आहे. आता २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. या मालिकेपूर्वी एका युवा फलंदाजाने पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे.
सध्या भारतीय संघातून बाहेर असलेल्या आणि आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या सर्फराज खान याने दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा झंझावाती कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. भारत अ संघाडकून खेळताना सर्फराजने ६१ चेंडूत शतकी खेळी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या सर्फराजने ४१ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ७१.७० च्या सरासरीने ३६५७ धावा कुटून काढल्या आहेत. मात्र तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकलेलं नाही. मात्र २०१५ पासून आयपीएल खेळत असलेल्या सर्फराजला या स्पर्धेत तितकीशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यावर्षी कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.
आयपीएल २०२२ च्या लिलावामध्ये २० लाख रुपयांच्या बेस प्राईजसह दिल्ली कॅपिटल्सने सर्फराजला खरेदी केले होते. २०२३ मध्येही तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्येच होता. मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. ४ सामन्यांमध्ये त्याला केवळ ५३ धावाच काढता आल्या. त्यामुळे २०२४ च्या लिलावापूर्वी दिल्लीने त्याला रिलीज केले होते. त्यानंतर लिलावामध्ये तो अनसोल्ड राहिला. आता त्याला भारतीय संघात स्थान मिळते का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेटप्रेमींची चिंता वाढली आहे. कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असलेला विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून अचानक मायदेशी परतला आहे. आता तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत शंका आहे. तसेच इशान किशन यानेही मालिकेतून माघार घेतली आहे.