नवी दिल्ली : जर मला प्रस्ताव मिळाला तर भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास मला कुठली अडचण नसून मी अधिक आक्रमक वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. शोएबने ही इच्छा सोशल नेटवर्किग अॅप ‘हॅलो’वर मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.
भविष्यात भारतीय गोलंदाजी विभागासोबत जुळण्याची इच्छा आहे का, याबाबत अख्तरने सकारात्मक उत्तर दिले. सध्या भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण जबाबदारी सांभाळत आहेत. क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान मारा करणाऱ्या गोलंदाजांमध्ये समावेश असलेला अख्तर म्हणाला, ‘मी सध्या असलेल्या गोलंदाजांच्या तुलनेत अधिक आक्रमक, वेगवान आणि आव्हान देणारे गोलंदाज तयार करीन. हे गोलंदाज फलंदाजांना आव्हान देण्यास सक्षम असतील.’
अख्तरने आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. अख्तरने २००८ मध्ये या टी-२० लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, अख्तरने १९९८ च्या मालिकेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. तो म्हणाला, ‘मी सचिनला बघितले होते, पण भारतात त्याचे स्थान काय आहे, याची मला कल्पना नव्हती. चेन्नईमध्ये मला कळले की तो भारतात ईश्वराच्या रूपाने ओळखला जातो. सचिन माझा चांगला मित्र आहे. मी १९९८ मध्ये आक्रमक वेगवान मारा केला आणि भारतीय चाहत्यांनी माझा उत्साहसुद्धा वाढविला. भारतात माझे मोठ्या संख्येने प्रशंसक आहेत.’ ‘मला निश्चितच ही जबाबदारी स्वीकारायला आवडेल. मी जे शिकलो आहे ते दुसºयासोबत शेअर करताना मला कुठली अडचण नाही.’