T20 World Cup 2024 : अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी सारे संघ उत्सुक आहेत. २० संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी केली गेली आहे आणि प्रत्येक गटातून अव्वल दोन असे ८ संघ सुपर ८ मध्ये खेळणार आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका असे संघ आहे आणि या गटातून भारत व पाकिस्तान यांचा सुपर ८ मध्ये प्रवेश पक्का समजला जात आहे. भारतीय संघाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार आहेत आणि हिच गोष्ट आता भारताची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे ( ICC) आणि क्रिकेट वेस्ट इंडिज ( CWI) यांनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नसल्याचे स्पष्ट केले आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारतीय संघाच्या हिताच्या दृष्टीने रात्री ८ वाजता आयोजित केला गेला आहे. जर भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास त्यांना २७ जूनला खेळावे लागेल. या सामन्यात पावसाची शक्यता आहे आणि राखीव दिवसही ठेवला गेलेला नाही. अशा परिस्थिती भारताची डोकेदुखी वाढू शकते.
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस नाही, परंतु अतिरिक्त २५० मिनिटे म्हणजेच ४ तास १० मिनिटांचा कालावधी दिला गेला आहे. त्यामुळे हा सामना त्याच दिवशी संपवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामन्यासाठी अतिरिक्त चार तास देण्यात आले आहेत जेणेकरून संघाला सलग दिवस खेळावे लागणार नाही, प्रवास करावा लागणार नाही आणि नंतर खेळावे लागणार नाही. पहिली सेमी फायनल २६ जूनला त्रिनिदाद येथे तेथील स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० वाजल्यापासून ( भारतीय वेळ पहाटे ६ वा.) सुरू होईल. या सामन्याला राखीव दिवस आहे आणि त्यामुळे पावसाचा व्यत्यय आल्यास २७ जूनला मॅच खेळवली जाईल.
दुसरा उपांत्य फेरीचा सामना गयाना येथे होईल आणि तेथील परिस्थिती वेगळी आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता ( भारतीय वेळ ८.३०) सुरू होईल आणि पावसाचा व्यत्यय आल्यानंतरही अतिरिक्त २५० मिनिटांत त्याच दिवशी संपवला जाईल. त्यामुळे अम्पायर्सना हा सामना पूर्ण करण्यासाठी ८ तास वाट पाहावी लागेली. २८ जून हा प्रवासाचा दिवस आहे आणि २९ जूनला फायनल होणार आहे.